शेतकऱ्यांसाठी दोन लाख सौर कृषी पंप देणार
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
राज्यातील मार्च 2022 पर्यंतच्या शेती पंपांना वीज जोडणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उर्जा विभागाने घेतला आहे. शेती पंपांसाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख सौर कृषी पंप देण्याचा आणि कृषी फीडर सौरऊर्जेवर आणण्याचा निर्णयही बुधवारी झालेल्या ऊर्जा विभागाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील प्रकाश गड कार्यालयात महा ऊर्जा नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती होल्डिंग कंपनीचे तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राज्यात दोन लाख सौरभ कृषी पंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील केंद्र सरकारच्या कुसुम योजनेअंतर्गत एक लाख तसेच महावितरणाच्या माध्यमातून एक लाख सौर कृषी पंपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. राज्यातील ऊर्जेची मागणी, विद्युत संच, शासन राबवत असलेल्या ऊर्जा संदर्भातील विविध योजना, वीज मंडळाची कामगिरी, विजेची सद्यस्थिती, विविध थकबाकी, कोळसा, मनुष्यबळ, भविष्यात राबवण्यात येणारा प्रकल्प, आधुनिकीकरण, आव्हाने अशा विविध विषयांचा या बैठकीत फडणवीस यांनी आढावा घेतला.
या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उपमुख्यमंत्र्याचे सचिव श्रीकर, परदेशी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महाऊर्जेचे अतिरिक्त महासंचालक सुरज वाघमारे, महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा