माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू
शिवशाही वृत्तसेवा मुंबई
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने मंगळवारपासून नव्याने सुनावणी सुरू केली. देशमुख यांनी आपल्या विरोधात ईडीकडे कोणतीही ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उच्च न्यायालयाला देशमुख यांच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेऊन त्यावर निर्णय देण्याची विनंती केली. देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी मंगळवारी युक्तिवाद पूर्ण केला. उद्या ईडी तर्फे युक्तिवाद करण्यात येईल.
मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून आपण शंभर कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सचिन वाझेला दिले नव्हते. आपल्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. किडीकडे आपल्या विरोधात कागदोपत्री किंवा डिजिटल पुरावे नाहीत , असा युक्तिवाद चौधरी यांनी न्या.एन.जे. जमादार यांच्या एकल पिठापुढे केला.
मार्चमध्ये विशेष इ एम एल ए न्यायालयाने देशमुख यांनी पोलिसांची बदली करण्याकरता स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्याचे दर्शवणारे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवीत त्यांचा जामीन अर्ज रद्द केला. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी 11 महिने कारागृहात काढले आहेत. त्यामुळे त्यांना आणखीन एकही दिवस कारागृहात काढावा लागू नये, असे चौधरी यांनी न्यायालयात सांगितले.
याचिकेवर आजही होणार सुनावणी
तपास यंत्रणांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबदावरून देशमुख यांना आरोपी केले आहे. मात्र, वाझे यांच्यावरच गुन्हे नोंदविले आहेत. त्यात अटलांटिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा समावेश आहे. त्याशिवाय ज्या पोलीस आयुक्तांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या पोलीस आयुक्त यांना पदावरून हटविल्यावरच का आरोप केले? पदावर असताना आरोप का केले नाहीत? असे प्रश्नही चौधरी यांनी उपस्थित केले. खटला नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशमुख यांची जामीनावर सुटका करावी. ते तपास यंत्रणेला सहकार्य करतील, असे चौधरी यांनी सांगितले. या याचिकेवरील सुनावणी उद्या ठेवली आहे .
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा