बायकोबरोबर भांडण झाल्याच्या रागात केले कृत्य
शिवशाही वृत्तसेवा जालना
झोपेत असलेल्या आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला शेततळ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील निधोन परिसरातील अनिल जिंदल स्कूल जवळील एका शेतात बुधवारी सकाळी घडली. श्रावणी जगन्नाथ डकले असे मयत चिमुकलीचे नाव आहे.
जगन्नाथ डकले हा मूळचा सिल्लोड तालुक्यातील गव्हाणी येथील रहिवासी आहे. तीन महिन्यापूर्वीच जालना तालुक्यातील निधोना रोडवरील अनिल जिंदल इंग्लिश स्कूल जवळील पवार यांच्या शेतात मजूर म्हणून तो कामाला आला होता. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शेतात काही महिलांबरोबर काम करीत होती, त्याचवेळी जगन्नाथ यांचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर रागात असलेल्या जगन्नाथ ने घरासमोरील झोक्यात झोपलेल्या दीड वर्षाच्या मुलीला उचलून थेट शेततळ्यात नेऊन फेकले. काही वेळाने त्याने पत्नीला मुलगी गायब झाल्याचे सांगितले. याची माहिती चंदनझिरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा शोध सुरू केला.
पोलिसांनी आई-वडिलांची चौकशी केली; परंतु ते दोघेही काहीच बोलायला तयार नव्हते. पोलिसांना वडिलांवर संशय आल्याने सायंकाळी त्यांची कसून चौकशी केली असता, मुलीला शेततळ्यात फेकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा