पत्नीकडे सोपवला तिरंगा, हवेत बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना
शिवशाही वृत्तसेवा सांगोला
कडलास येथील शहीद जवान संतोष गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय भावुक वातावरणात, "भारत माता की जय" "अमर रहे, अमर रहे, शहीद जवान संतोष गायकवाड अमर रहे," च्या घोषणा देत, फुलांनी सजवलेल्या वाहनातून, तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढून, पार्थिवावर ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय व सांगोला पोलीस प्रशासनातर्फे हवे तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडून, मानवंदना देऊन शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
यावेळी ग्रामस्थ, नातेवाईकांनी श्रद्धांजली वाहताना शहीद संतोष गायकवाड यांच्या पत्नी दिपाली गायकवाड यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे केली. जवान संतोष गायकवाड यांना वीरमरण आल्यानंतर तीन दिवस ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून शोक व्यक्त केला. कडलास चे सुपुत्र जवान संतोष उर्फ दत्ता गायकवाड यांना पठाणकोट-जम्मू सीमेवर कर्तव्यावर असताना 24 ऑगस्ट रोजी निमोनियाची लागण झाली होती. त्यांना लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान 12 सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले होते.
मंगळवार, दिनांक 13 सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव पठाणकोट ते जम्मू तेथून विमानाने पुण्यात आणले. विमानतळावर आर्मीच्या पुणे मुख्यालयाच्या वतीने मानवंदना दिली. त्यानंतर आर्मीच्या रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव बुधवार, दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कडलास ( गायकवाड वस्ती, ता. सांगोला ) येथे मूळ गावी आणले. ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या घरापासून फुलांनी सजवलेल्या चार चाकी वाहनातून त्यांचे पार्थिव ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंतदर्शनासाठी ठेवले.
चुलत भावाने दिला अग्नीचुलत भाऊ शिव शंभो गायकवाड यांनी त्यांच्या चितेला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित ग्रामस्थासह नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी सुभेदार दत्तू सोनवणे यांनी वीर पत्नी दिपाली गायकवाड यांच्याकडे तिरंगा सुपूर्द करताच त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. त्यांनी स्वतःच्या आठ महिन्याच्या मुलाला कवटाळून पती संतोष च्या आठवणींना उजाळा दिला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा