कडुनिंबाच्या पाल्याचा धूर करा अन लम्पी स्कीन आजार टाळा
शिवशाही वृत्तसेवा सांगोला
सांगोला तालुक्यात अद्याप लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून पशुपालकांनी आपल्या शेताबाहेर जनावरांची कोठेही वाहतूक करू नये. सायंकाळच्या वेळी जनावरांच्या गोठ्यात कडुनिंबाच्या पानाचा दूर करून हा रोग टाळावा. लम्पी स्किन डिसीजची जनावरांना लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी त्वरित शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी केले.
मंगळवार, दि.१३ सप्टेंबर रोजी सांगोला तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. असलम सय्यद यांच्या समवेत शासकीय पशुसंवर्धन अधिकारी व खासगी पशुसेवकांची बैठक पार पडली. यावेळी तहसीलदारांनी सांगोला तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. लम्पी स्किन डिसीज हा गाय वर्गातील विषाणूजन्य आजार असल्याने सध्या हा रोग महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात पसरला आहे. त्यामध्ये माळशिरस तालुक्यात काही जनावरांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या सांगोला तालुक्यात याचा प्रादुर्भाव आढळून आला नाही; परंतु खबरदारी म्हणून हा रोग सांगोल्यामध्ये येऊच नये, या दृष्टीने प्रशासन अलर्ट झाले आहे. पशुपालकांनी या रोगाला घाबरू नये, हा रोग माणसांमध्ये संक्रमित होत नाही. गोचीड, गोमाशा, मच्छर यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रोगाचा प्रसार होतो. त्यासाठी आपली जनावरे शेताच्या बाहेर कोठेही वाहतूक करू नये. जनावरांना अंगावर मोठ्या गाठी येऊन काही प्रमाणात पायावर सूज येते, अशी लक्षणे लम्पी स्कीन आजाराची आहेत. हा रोग टाळण्यासाठी दररोज सायंकाळी ६ नंतर कडूनिंबाच्या पालाचा दूर करावा, जेणेकरून लम्पी स्किन जनावरांवर आक्रमण करणार नाही, असे तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेऊ नयेतप्रशासकीय पातळीवर जरी लस उपलब्ध नसली तरी खासगी लस उपलब्ध आहे. खासगी पशु सेवा दात्याने प्रति जनावर ५० रुपये माफी घेऊन लसीकरण करावे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेऊ नयेत, अशा सूचना तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिल्या आहेत. लसीचा डोस प्रत्येक जनावरास एक मिली असणार आहे. अशी माहिती देऊन या रोगाबाबत कोणीही अपप्रचार करीत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.डॉ. असलम सय्यद,तालुका पशुसंवर्धन अधिकारी, सांगोला
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा