उच्चशिक्षित इंजिनियर तरुणाचे अमानुष कृत्य
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. दारू पिऊन घरी आल्याबद्दल जाब विचारणाऱ्या इंजिनियर पत्नीचा पतीने खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी इंजिनियर आरोपी पती याच्याविरोधात भारतीय दंड विधान 302 नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शिवम पचौरी उर्फ भारद्वाज असे या आरोपी पतीचे नाव असून, अवंतिका शर्मा असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अवंतिकाचे वडील रंजनकुमार शर्मा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम पचौरी याला पोलिसांनी अटक केली असून, ही घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास माणगाव हिंजवडी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अवंतिका आणि आरोपी शिवम आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीला होते. शिवम हा दारू पिऊन घरी आला. पत्नी अवंतिकाने त्याला दारू पिऊन आल्याबद्दल जाब विचारला. यावरून या दोघांमध्ये वाद झाला. या वादात आरोपी पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी त्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटले, त्याचबरोबर तिचा गळा आवळला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीसमोरच घडली. या मारहाणीत पत्नी अवंतिका गंभीर जखमी झाल्याने, तिचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र गाढवे हे करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा