रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अडकून पडली पुण्याची गायत्री
शिवशाही न्यूज विशेष
आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या भवितव्यासाठी बाप अहोरात्र झटत असतो. विशेषता बापाचे आपल्या मुलींवर अतोनात प्रेम असते. तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बाप ऐकत नसतानाही धडपडत असतो, आणि मुलीचे आयुष्य सर्वांगसुंदर करण्याचे स्वप्न पाहत असतो. मात्र मुलीच्या आयुष्यात एखादे संकट आले, तर तो वेडापिसा होतो. पुण्याच्या विजयकुमार मोरे यांचा काळीज कापणारा टाहो, बाप आणि मुलीच्या नात्याचे वर्णन करण्यास पुरेसा आहे.
विजयकुमार पोरे यांची मुलगी गायत्री, हिची लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यासाठी गायत्रीने युक्रेनला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले. मात्र शेवया बनवून विकण्याचा, छोटा व्यवसाय करणारे विजयकुमार, यांना हा खर्च झेपणारा नव्हता. तरीही विजयकुमार यांनी, नाना खटपटी करून, अहोरात्र कष्ट करून, मुलीला दोन महिन्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी, युक्रेनला पाठवले. आपली मुलगी डॉक्टर होऊन येईल, आणि आपल्या कष्टाचे सार्थक होईल. या गोड स्वप्नात रममाण असतानाच, ती दुर्दैवी बातमी विजयकुमार यांच्या कानावर आदळली.
गायत्री युक्रेनला गेली आणि दोन महिन्यातच रशिया ( Russia ) आणि युक्रेनमध्ये ( Ukraine ) युद्धाची ( war situation ) ठिणगी पडली. रशियाने युक्रेन वर हल्ला केल्याने, युक्रेनमध्ये शिकणारे विद्यार्थी ( medical student ) तिथे अडकून पडले. त्यात गायत्री देखील आहे. वास्तविक युद्धाचे चिन्ह दिसताच, तिला मायदेशी परत आणण्यासाठी विजयकुमार यांनी, तिचे विमानाचे तिकीट बुक केले होते. परंतु ज्या दिवशी तिचे विमान निघणार होते, त्याच दिवशी रशियाच्या हल्ल्यामुळे, विमानसेवा बंद झाली, आणि गायत्रीला भारतात येता आले नाही.
या सर्व घडामोडी मुळे विजय कुमार यांच्यातला बाप अस्वस्थ झाला आहे. सैरभैर मनाने, मुलीला मायदेशी परत आणण्यासाठी, जे जे करता येईल ते करत आहे. सरकारी पातळीवरून, सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. आणि ते सर्व विद्यार्थी परत येतीलही, परंतु हजारो किलोमीटर दूर संकटात सापडलेल्या आपल्या मुलीसाठी बापाने फोडलेला टाहो सर्वांचे काळीज कापत जाणारा आहे.
व्हिडीओ नक्की पहा -
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा