पार्क मैदानावर गायले होते मोगरा फुलला
सोलापूरकरांनी जागवल्या लता दीदींच्या आठवणी
शिवशाही वृत्तसेवा सोलापूर
गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर ( lata mangeshkar ) यांच्या निधनाची बातमी समजताच जगभरातील संगीत रसिक शोकसागरात बुडाली आहेत. आपल्या स्वर्गीय सुरांनी रसिकमनावर अधिराज्य केलेल्या लतादीदीं विषयी प्रत्येकाच्या मनात काही ना काही आठवणी आहेत. त्या आठवणींना सर्व जण आज उजाळा देत आहेत. वीस वर्षापूर्वी लतादीदींचे स्वर्गीय स्वर सोलापुरातल्या ( solapur ) पार्क मैदानावर उमटले होते, आजही ते दरवळत आहेत, अशा आठवणी आज सोलापूरकरांनी जागवल्या.
लतादीदींना मानपत्र देणारी सोलापूर पहिली महापालिका
फेब्रुवारी 1994 मध्ये सोलापूर महापालिकेने लतादीदींना मानपत्र देऊन गौरव केला होता. लतादीदींना मानपत्र देणारी सोलापूर पहिली महापालिका ठरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (sharad pawar ) यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यावेळचे सोलापूरचे महापौर मनोहर सपाटे, ( manohar sapate ) विलासराव देशमुख, ( vilasrao deshmukh ) सुशीलकुमार शिंदे, (sushilkumar shinde ) डॉ. पद्मसिंह पाटील, (dr. padmsinh patil ) विजयसिंह मोहिते पाटील, ( vijaysinh mohite - patil ) असे जिल्हा आणि राज्यातील बडे नेते मंडळी, त्याचबरोबर मिना मंगेशकर ( meena mangeshkar ), उषा मंगेशकर ( usha mangeshkar ), या सुद्धा त्या वेळी उपस्थित होत्या. सुमारे लाखभर लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला होता.
पार्क मैदानात पार पडलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या आग्रहाखातर लतादीदींनी 'मोगरा फुलला' या गाण्याच्या दोन ओळी गायल्या. त्यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या लता दीदींच्या आठवणी सोलापूरकरांच्या मनात आजही घर करून आहेत. आणि लतादीदींचे ते स्वर्गीय स्वर पार्क मैदानात दरवळत आहेत, अशा आठवणी सोलापूरकरांनी जागवल्या आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा