जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या पदरी केळं आणि गाजरं
शिवशाही न्यूज विशेष
राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पंढरपूरला आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे मोठे नेते पंढरपूरात येणार असल्याने, तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून नॉटरिचेबल असलेले, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने, विठ्ठल चे सभासद शेतकरी व कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या कार्यक्रमात, विठ्ठल कारखान्याच्या संदर्भात काही सूतोवाच करतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र हा पक्षाचा कार्यक्रम असल्याचे सांगत, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, या विषयाला संपूर्ण बगल दिल्याने, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी व कामगारांची घोर निराशा झाली आहे.
या कार्यक्रमाने विठ्ठल च्या सभासद शेतकऱ्यांना, गाजरं मिळाली का? असा सवाल करत , सभासद शेतकऱ्यांनी शिवाजी चौक परिसरात केळं आणि गाजरं वाटप केली. विठ्ठल चे चेअरमन भगीरथ भालके, हे पक्षाच्या आणि निवडणुकीच्या संदर्भातील कार्यक्रमांना उपस्थित राहतात, मात्र कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. कारखान्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरीही चेअरमन भगीरथ भालके हे फक्त निवडणुकीचाच विचार करत असतात. त्यामुळे विठ्ठल सहकारी कारखाना, सभासद शेतकरी व कामगारांच्या हातात फक्त केळं आणि गाजरंच उरली आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिल्या
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा