जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा
शिवशाही विशेष
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचा झंझावाती दौरा करत राष्ट्रवादीतील गटबाजीवर आणि दुफळीवर पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते सांगोला पंढरपूर आणि माढा या तालुक्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेत आहेत. गटबाजी मिटवून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा संकल्प केला आहे.
तालुक्यात येत्या काळात पंढरपूर नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाने, यांच्या निवडणुका होणार आहेत. पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर पंढरपूर राष्ट्रवादीमध्ये प्रचंड दुफळी आणि गटबाजी उफाळून आली होती. या सर्वाचा येत्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता पाहता पक्षाची मोट बांधणे गरजेचे होते. हीच बाब लक्षात घेऊन नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर पंढरपूर सह करमाळा श्रीगोंदा उस्मानाबाद आणि भूम परांडा या पाच तालुक्यात पक्ष बांधणी करण्याची जबाबदारी दिली होती. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
पंढरपुरात संत तनपुरे महाराज मठात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत आहेत मात्र या बैठकीपूर्वी ही मंत्री जयंत पाटील यांचे स्वागत करण्यासाठी शहरभर बॅनर लावले गेले आहेत या बॅनर मधूनही राष्ट्रवादीतील गटबाजीत अधोरेखित होत आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या नावे बॅनर लावले आहेत.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ पोटनिवडणूक, तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेते गेल्या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना संपूर्ण तालुक्याने पाहिले आहेत तसेच जिल्हा दूध संघाची निवडणूक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काही पदाधिकारी स्वतंत्र बैठका घेत आहेत व माध्यमांसमोर विधाने करत आहेत. त्यामुळे पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मतमतांतरे वारंवार उघड होत असून, यातून पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे या बैठकीत पक्ष बांधणी आणि एक जुटी बाबत चर्चा होऊन निर्णय होईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता करत आहे
या बैठकीनंतर तरी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस संपेल का? आणि आगामी निवडणुकीला पंढरपूर राष्ट्रवादी एक दिलाने सामोरे जाईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा