दि. ६ डिसेंबर रोजी कर्नाटक छत्रपती शिवरायांना अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा
संपूर्ण देशाचे शक्तीपीठ, ऊर्जास्थान म्हणजे दुर्गराज रायगड. श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर येत आहेत ; ही सर्वांसाठीच अतिशय गौरवास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात राष्ट्रपती व पंतप्रधान अशा दोन्ही पदांवरील मान्यवरांनी भेट दिलेला रायगड हा एकमेव असा किल्ला आहे. या आधी १९८० साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथी दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दुर्गराज रायगडवर आल्या होत्या. १९८५ साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी माननीय राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते.
३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी महाराजांची प्रतिमा असलेले २ रुपये किंमतीचे नाणे भारत सरकारच्या वतीने काढण्यात आले होते.
त्यानंतर प्रथमच देशाचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येत आहेत.
राष्ट्रपती कोविंद स्वतः शिवभक्त असून २०१८ साली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने राजधानी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच सोहळ्यात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी माननीय राष्ट्रपती महोदयांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट म्हणून दिले होते. त्यापूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने सदरचे तैलचित्र राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी अत्यंत अभिमानाने लावलेले आहे.
त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेऊन त्यांना किल्ले रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. युवराज संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून गडावर संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, याचीही माहिती संभाजीराजे यांनी यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना दिली होती. संभाजीराजे यांच्या निमंत्रणास प्रतिसाद देऊनच शास्त्रोक्त पद्धतीने सुरू असलेल्या या गडसंवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद रायगडास येत आहेत, हि सर्व शिवभक्तांसाठी आनंददायी बाब आहे.
मंगळवार दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वा. १५ मिनिटांनी राष्ट्रपती महोदयांचे लष्करी हेलिकॉप्टरने किल्ले रायगडावर आगमन होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये खा. संभाजी राजे छत्रपती यांनी दिली आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा