उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनात पंढरपूर क्राईम ब्रँच ची कामगिरी
गुन्ह्याची माहिती देताना उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार व गुन्हे शाखेचे राजेंद्र मगदूम |
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपुरातील परदेशी नगर येथे सप्टेंबर महिन्यात सुभाष माचनुरकर यांच्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरले होते. या गुन्ह्याची पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कलम 392 नुसार गुन्हा दाखल करून, उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनात क्राईम ब्रांचने तपास करत असताना, मौजे मेडद तालुका माळशिरस येथील एका इसमाने सदरचा गुन्हा केला असल्याचा सुगावा लागला. मात्र हा आरोपी मा. जिल्हा व सत्र न्यायालय सातारा यांच्या न्यायालयीन कोठडीत होता. सदर आरोपी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय सातारा यांच्याकडून वर्ग करून घेतले व पंढरपूर क्राईम ब्रांचने कौशल्याने तपास व चौकशी केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपीकडून सदर गुन्ह्यातील एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच चौकशी दरम्यान या आरोपीने आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील एका सराफी दुकानावर तलवारीचा धाक दाखवून भरदिवसा दरोडा टाकला असल्याचे निष्पन्न झाले. या दरोड्यात 53 ग्रॅम वजनाचे दोन लाख 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले असल्याचे समोर आले आहे. तोही मुद्देमाल जप्त करून आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्याची तजवीज केली आहे. अधिक चौकशी करता या आरोपीने नातेपुते, सांगोला, दौंड, माळशिरस, शिरवळ, लोणी काळभोर, आदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले असून, आरोपी अजय संजय आढाव ( वय 21 ) रा. मेडल, असे या सराईत आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी, हेडकॉन्स्टेबल शरद कदम, बिपिनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, इरफान मुलाणी, पोलीस नाईक शोएब पठाण, महेश पवार, सुनील बनसोडे, सुजित जाधव, पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने, विनोद पाटील, अर्जुन कोवळे यांनी ही कामगिरी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार सुरज हेंबाडे हे करीत आहेत
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा