ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी थेट गाठली सरकोली
चेअरमन भगीरथ भालके यांच्या घरासमोरच उपोषणाला बसले |
पंढरपूर - शिवशाही वृत्तसेवा
कारखान्यांचा दुसरा हंगाम सुरू झाला तरी, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने अजून शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नाहीत. याबाबत अनेकदा विचारणा करूनही चेअरमन किंवा संचालक शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याबाबत काहीच सांगायला तयार नाहीत. अनेकदा पैसे देण्याच्या तारखा देण्यात आल्या, परंतु पैसे मिळाले नाहीत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, यांनासुद्धा शेतकऱ्यांनी अनेकदा विचारणा केली. मात्र भगीरथ भालके समोर येत नाहीत आणि आपले मौन सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील विठ्ठलाचे सभासद शेतकरी, परमेश्वर पाटील, बापू रुपनर, ब्रह्मदेव पाटील, सिताराम पाटील, शत्रुघ्न मासाळ, बिरा पाटील, खंडू मेटकरी, नामदेव बोरकर, आशिष मिटकरी, आणि भास्कर चंदनशिवे, हे थेट सरकोली येथे, चेअरमन भगीरथ भालके, यांच्या घरासमोर उपोषणाला बसले आहेत. चेअरमन भगीरथ भालके बाहेर येत नसतील, तर आम्ही त्यांच्यासमोर जातो, असे सांगून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी उपोषणाला बसले असून, ऊस बिलाचा निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आता तरी चेअरमन भगीरथ भालके, बाहेर येऊन बिलाच्या प्रश्नाविषयी काही बोलतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा