अक्कलकोट तालुक्यातील कलाप्पावाडी येथील घटना - पोलिसांनी आरोपी वडिलास ताब्यात घेतले
![]() |
मयत रघुनाथ जानकर |
अक्कलकोट - प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील कलाप्पावाडी येथे बुधवारी (दिनांक30) रात्री साडेअकराच्या सुमारास रघुनाथ राजेंद्र जानकर (वय 28) याचा खून झाला आहे. शेती विकून ट्रॅक्टर घेण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या मुलाचा त्याच्या वडिलांनीच कुर्हाडीने वार करून खून केला आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र जानकर (वय 49) हे अक्कलकोट तालुक्यातील कलाप्पावाडी येथे राहत असून, व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांना रघुनाथ व मंगलदास अशी दोन मुले आहेत. मोठा मुलगा रघुनाथ याने ट्रॅक्टर घेण्यासाठी शेती विकून पाच लाख रुपये द्या, अशी मागणी वडिलांकडे केली होती. मागील काही दिवसापासून मुलगा रघुनाथ याने ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये द्या असा सारखा तगादा लावला होता, मात्र राजेंद्र यांनी शेती विकण्यास नकार दिला होता.
याच कारणावरून बुधवारी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी मुलगा रघुनाथ याने ट्रॅक्टर साठी पैसे द्या, अशी मागणी करत वडील राजेंद्र यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. परंतु राजेंद्र यांनी मी शेती विकून पैसे देणार नाही, असाच पवित्रा घेतला. यातून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने, हातघाईवर आले. यावेळी मुलगा रघुनाथ याने वडिलांची कॉलर पकडली. राजेंद्र यांनी रघुनाथला ढकलून दिले, आणि रघुनाथ खाली पडल्यानंतर रागाच्या भरात, शेजारीच असलेली कुऱ्हाड उचलून मुलगा रघुनाथ च्या डोक्यावर पाठीवर कुर्हाडीने सपासप वार केले. यात वर्मी घाव लागून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने, रघुनाथ याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत रघुनाथ त्याचा भाऊ मंगलदास यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा केला आहे. तसेच मुलाच्या खुनाच्या आरोपाखाली, वडील राजेंद्र जानकर (वय 49) याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा