भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा
![]() |
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन |
ट्रॅजेडी किंग नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज 7 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता निधन झाले. 98 वर्षांचे दिलीप कुमार मागील काही दिवसांपासून आजारी होते. मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती, मात्र सकाळी साडेसात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
![]() |
सायराबानू यांच्याशी लग्न केले होते |
पेशावर मध्ये झाला होता जन्म
पेशावर मध्ये जन्मलेले दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. 1940 च्या दशकामध्ये त्यांनी, त्या काळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी, यांच्या बॉम्बे टॉकीज मधून काम करण्यास सुरुवात केली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपट क्षेत्रातल्या सर्वोच्च शिखरावर ते पोचले. उर्दू वर त्यांचे चांगले प्रभुत्व होते, त्यामुळे त्यांची संवादफेक आणि स्पष्ट उच्चार हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ब्लॅक अँड व्हाईट आणि इस्टमनकलर पासून, आधुनिक सिनेमा पर्यंत, भारतीय सिनेमा जगतातील सर्व बदलांचे आणि विकासाचे ते साक्षीदार होते. मोगले आजम, नया दौर, गोपी या त्यांच्या जुन्या चित्रपटांपासून कर्मा, सौदागर पर्यंत प्रत्येक चित्रपटातील त्यांचा अभिनय रसिकांच्या कायम स्मरणात राहील असा होता.
![]() |
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता |
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
अभिनेत्री सायरा बानू यांच्यासोबत त्यांनी लग्न केले होते. आयुष्याच्या प्रत्येक चढ-उतारावर सायराबानू यांनी त्यांना साथ दिली आहे. चित्रपट क्षेत्रातला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार, तसेच पद्मविभूषण यासह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या निधनामुळे एका कलाकाराला आपण गमावले असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्यासह राजकीय, चित्रपट व इतर सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. दिलीप कुमार स्वतः एक सिनेमा संस्था होते, त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात त्यांच्या चाहात्यांवर आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा