पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, आणि आटपाडी, या तालुक्यांचा समावेश करून स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी
![]() |
Shri Vitthal Rukmini mandir |
सोलापूर - प्रतिनिधी
भौगोलिक दृष्ट्या व जनतेच्या सोयीसाठी, सोलापूर जिल्हा फोडून, स्वतंत्र पंढरपूर जिल्हा करावा, असा ठराव गुरुवारी जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यामध्ये सध्याच्या सोलापूर जिल्ह्यातील, पंढरपूर सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, तसेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी, या तालुक्यांचा समावेश करून स्वतंत्र पंढरपूर जिल्ह्याची निर्मिती करावी, असा प्रस्ताव सदस्य ॲड.सचिन देशमुख यांनी मांडला होता. त्याला वसंत देशमुख व भारत आबा शिंदे यांनी अनुमोदन दिले. सभेत चर्चेनुसार सर्वानुमते मंजुरी दिल्याने, जिल्हा परिषद अध्यक्ष, अनिरुद्ध कांबळे, यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. याबाबत शासनाला ठराव पाठवून, पाठपुरावा करू, असेही सर्वानुमते जाहीर करण्यात आले. एकूणच यामुळे, अनेक वर्षे भिजत घोंगडे असलेल्या, पंढरपूर जिल्ह्याच्या निर्मितीचा विषय, पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यासंदर्भात एडवोकेट देशमुख म्हणाले, "सांगोल्याच्या जुनोनी, माळशिरस, पंढरपूर, माढा, या सर्वच तालुक्यांना सोलापूर जिल्ह्याचे ठिकाण, सुमारे शंभर किलोमीटर पेक्षा अधिक लांब पडते. सर्व व्यवहार हे सोलापूर पेक्षा पंढरपूरला अधिक आहेत. पण सर्वच शासकीय कामांसाठी या तालुक्यातील जनतेला, सोलापूरला संपूर्ण दिवस घालवावा लागतो. एका दिवसात काम न झाल्यास, वारंवार हेलपाटे घालावे लागतात. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, पण वेळेचाही मोठा अपव्यय होतो. वास्तविक पंढरपूर हे, जिल्ह्याच्या ठिकाणाएवढेच महत्वपूर्ण बनलेले आहे. पंढरपूरला स्वतंत्र प्रांत कार्यालय आहे. जिल्हा न्यायालय आहे. माळशिरस येथेही अशाच प्रकारे सोय आहे. सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत, शिवाय अकलूज, माळशिरस, मंगळवेढा, सांगोल्याचे पंढरपुरात दैनंदिन व्यवहार आहेत. सोलापूरची फक्त शासनाच्या दप्तरी नोंद किंवा कामापुरता संबंध येतो."
जिल्ह्यात मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, पंढरपुर, सांगोला, हे तालुके सर्वाधिक सधन आहेत. इथूनच शासनाला, सर्वाधिक महसूल मिळतो. मात्र त्या तुलनेत या भागाला निधी कमी मिळतो. या तालुक्यातील लोकांची, फक्त जिल्हा परिषद, व जिल्हाधिकारी कार्यालयासाठीच, सोलापूरला जाणे होते. सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर, ये-जा करणे, सर्वसामान्यांना परवडत नाही. दुसरीकडे खानापूर, आटपाडी परिसरातील नागरिकांनाही, त्यांच्या जिल्ह्याचे ठिकाण असलेले, सांगली, हे लांब पडत आहे. आटपाडी खानापूर परिसराचा, भौगोलिक दृष्ट्या पंढरपुरलाच जास्त संबंध येतो. त्यामुळे या तालुक्यांचा समावेश करून, स्वतंत्र पंढरपूर जिल्ह्याची निर्मिती करावी. ठराव घेऊन यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला प्रस्ताव पाठवावा अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता पंढरपूर जिल्हा होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
पंचवीस वर्षापासून पंढरपूर जिल्ह्याचा प्रस्ताव प्रलंबित
पंढरपूर हा लोकसभा मतदार संघ होता. यामध्ये पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, खानापूर, आटपाडी, आणि जत, या तालुक्यांचा समावेश होता. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, हे याच मतदारसंघातून, दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. पण मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर, माढा मतदार संघाची निर्मिती झाली. त्यामुळे पंढरपूर जिल्ह्याचा विषय मागे पडला होता.
तीर्थक्षेत्र पंढरपूरला यामुळे फायदा होईल
महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी, आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर, हे शहर तसे पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पंढरपूर हे राजकीय, भौगोलिक, आर्थिक, व्यवसायिक, आणि प्रशासकीय अशा सर्वच पातळ्यांवर जिल्हा होण्यासाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे पंढरपूर जिल्हा झाल्यास स्वतंत्र जिल्हाधिकारी आणि निधी उपलब्ध होईल. तीर्थक्षेत्र विकासाबरोबरच, आसपासच्या तालुक्यांचाही अतिरिक्त निधीमुळे विकास करणे सोपे जाईल.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा