शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर शोककळा

Former MLA Ganpatrao Deshmukh, sangola, Solapur, shivshahi news
Former MLA Ganpatrao Deshmukh

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख, यांचे आज दिनांक 30 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते.

 गेल्या काही दिवसांपासून, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सोलापूर येथील, अश्विनी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज ३० जुलै रोजी, रात्री साडेनऊच्या सुमारास, त्यांनी जगाचा निरोप घेतला. सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक बारा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गणपतराव देशमुख, सहकार सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे, ज्येष्ठ नेते होते. शेतकरी कामगार पक्षाच्या मोजक्या राहिलेल्या नेतृत्वाच्या फळीतले ते बिनीचे शिलेदार होते. 1962 पासून 2019 पर्यंत ते आमदार होते. 1972 आणि 1995 हे दोन अपवाद वगळता, ते प्रत्येक निवडणुकीत विजय झाले होते. 2019 च्या निवडणुकीत वृद्धापकाळामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही. आपल्या 54 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत, त्यांनी सांगोला सारख्या दुष्काळी पट्ट्याचे नेतृत्व केले. रोजगार हमीच्या माध्यमातून, त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामांना गती दिली होती. त्याचबरोबर हा दुष्काळी पट्टा सिंचनाखाली आणावा, व सांगोला परिसर सुजलाम सुफलाम करावा, यासाठी सांगोला तालुक्यात, सिंचन प्रकल्पाद्वारे पाणी आणण्यासाठी, त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. इतकी वर्षे आमदार असूनही त्यांच्या आमदारकीचा बहुतेक कालावधी विरोधी बाकावर गेला . 1978 मध्ये पुलोद आणि 1999 मध्ये काँग्रेस असे दोन वेळा ते सत्तेत राहिले होते.

      सत्तेसाठी पदोपदी पक्षनिष्ठा आणि विचारधारा बदलण्याच्या सध्याच्या राजकारणाशी त्यांचे आचरण विसंगत होते. राजकारणातील अनेक चढ-उतार पाहिलेले गणपतराव देशमुख, विचाराचे पक्के होते. त्यांनी कधीही आपला पक्ष बदलला नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, गोपीनाथ मुंडे, विजयसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक, अशा विविध पक्षातील नेत्यांशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध जपले होते. अतिशय साधी राहणी असणारे भाई गणपतराव देशमुख स्वभावाचे मात्र परखड होते.

     सांगोला सहकारी सूतगिरणी सह, अनेक संस्थांचे त्यांनी जबाबदारीने नेतृत्व केले. दूध संघ, भूविकास बँक या संस्थांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांनी आयुष्य झिजवले होते. अशी दैदिप्यमान राजकीय कारकीर्द असलेल्या नेत्याच्या निधनामुळे, महाराष्ट्राच्या राजकारणाचे, कधीही भरून निघणार नाही, असे नुकसान झाले असून, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.



-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !