महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
सोलापूर - (प्रतिनिधी) शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते, माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू दे अथवा नाही करू दे त्यांना पुन्हा शिवसेनेत घेतले जाणार नसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महेश कोठे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती त्यावेळेस यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती परंतु, त्यांनी पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ते शिवसेनेतील नेते होते. कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली असल्याने पक्षाच्या आदेशान्वये त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना कोठे हे आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेने सोबत आपल्याला कायम राहायचे असल्याची घोषणा केली होती.
सोलापुरातील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे शहरातील राजकारणात हस्तक्षेप करीत आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचेही बरडे यांनी सांगितले. बरडे म्हणाले, शिवसेनेने कोठे यांना आजवर अनेक पदे दिली होती. जिल्हाप्रमुख पदाचे सर्व अधिकारी मिळाल्यानंतर त्यांनी पक्षात मनमानी कारभार सुरू केला. पक्षाच्या हितापोटी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मागील महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्याचे सर्व अधिकार त्याच्याकडे होते. मात्र कोठे यांनी अनेक उमेदवारांना वेळेत एबी फॉर्म दिला नाही. तरी पक्षासाठी आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 22 नगरसेवक आल्याचे ते एकटेच श्रेय घेत राहिले आहेत. पुढे त्यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी आणि परिवहन समिती सदस्य निवडीच्या वेळी पक्षाच्या वरिष्ठांकडून आलेल्या नावाला डावलत आपल्या बगलबच्च्यांना संधी दिली. शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या आदेशाने महेश कोठे यांची हकालपट्टी केली असल्याचेही बरडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस शहर प्रमुख नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, शंकर चौगुले, नगरसेवक राजकुमार हंचाटे, विष्णू कारमपुरी, भारत सिंग बंडू रवाले, महेश धाराशिवकर आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा