संक्रांत वाण म्हणून लुटले फेस मास्क
सोनार परिवाराचा अनोखा उपक्रम
सोनार परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी
पंढरपूर (प्रतिनिधी) : साधारणपणे मकर संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत सवाष्ण स्त्रिया एकमेकींच्या जीवनातील सुखदुःख वाटून घेण्याची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून आजही अनेक स्त्रिया आपल्या परिसरातील आणि परिचयातील सवाष्ण स्त्रियांना संसारोपयोगी वस्तू स्नेहभेट स्वरुपात देतात. परंतु या पारंपरिक रिती रिवाजाला काळाची गरज ओळखून आधुनिकतेची जोड देत येथील सोनार परिवारातील सौ. कल्याणी किरण सोनार व सौ. सविता रवि सोनार यांनी जागतिक पातळीवरील समस्या असलेल्या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सवाष्ण स्त्रियांना वाण म्हणून फेस मास्क स्नेहभेट स्वरुपात दिले.
नेहमीच भारतीय सण आणि उत्सवांच्या संस्कृतीला आधुनिकतेची जोड देत समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या सोनार परिवाराने याआधी संक्रांत वाण स्वरुपात वाचन संस्कृती वाढावी म्हणून वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी अनेक मान्यवर मराठी साहित्यिकांची वाचनीय पुस्तके तसेच निसर्गातील हिरवाई वाढावी म्हणून हरितक्रांती वृद्धीमध्ये सर्वांचा सहभाग असावा म्हणून संक्रांत वाण स्वरुपात वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण भारतीय वृक्षांच्या बीजांचे प्रत्येक सवाष्ण स्त्रियांच्या कुटुंबियांना किमान दहा व कमाल शंभर बीजगोळे देऊन ते ओसाड माळरानावर आणि घाटाच्या नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा पसरवण्यासाठी स्नेहभेट म्हणून दिले आहेत. तर एका संक्रांत सणाच्या निमित्ताने वाण म्हणून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील सर्वच ज्येष्ठांना स्टीलची पसरट थाळी स्नेहभेट स्वरुपात दिले. तसेच संक्रांत सणाच्या औचित्याने येथील पालवी संस्थेच्या एक ते पाच वयोगटातील अकरा बालकांना पारंपारिक रुढी परंपरा जपताना बोरन्हाण घातले.
विविध भारतीय सण आणि उत्सवांच्या औचित्याने अधिकाधिक कुटुंबांनी असे समयोचित उपक्रम राबविल्यास ते ही एक प्रकारचे सामाजिक कार्यच ठरेल असे मत संक्रांत सणाच्या निमित्ताने सोनार यांच्या घरी भेट दिलेल्या सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, व्यवसायिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक सवाष्ण महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. संक्रांत सणाच्या निमित्ताने आयोजित सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोनार परिवारातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा