रतनचंद शहा बँकेत साडेपाच कोटीचा अपहार
 |
ratanchand bank tembhurni
|
टेंभुर्णी - (प्रतिनिधी) टेंभुर्णी येथील रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा या बँकेच्या टेंभुर्णी शाखेत बँकेचा शाखाधिकारी व कॅशियर यांनी संगनमत करून पाच कोटी 57 लाख 2 हजार 822 रुपयांचा अपहार केला असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू (रा. सांगोला, जिल्हा सोलापूर) व कॅशियर अशोक भास्कर माळी (रा. टेंभुर्णी, तालुका माढा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दोघेही फरार झाले असून, तब्बल साडेपाच कोटीचा अपहार उघडकीस आल्याने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा या बँकेची टेंभुर्णी शाखा आहे. येथे हरिदास राजगुरू हा शाखाधिकारी म्हणून, तर अशोक माळी हा कॅशियर म्हणून काम पहात होते.या दोघांनी संगणमत करून तीन बँकाच्या शाखातील प्रत्यक्ष उपलब्ध नसलेल्या हातावरील शिल्लक रकमेचा परस्पर अपहार केला आहे, अशी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात 31 डिसेंबर 2020 रोजी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दोघांनी 2016 ते डिसेंबर 2020 या कालावधीत रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत असलेली व प्रत्यक्ष उपलब्ध नसलेली हातावरील शिल्लक रक्कम एक कोटी 14 लाख 87 हजार 822 रुपये,बँक ऑफ इंडिया शाखेच्या खात्यातील तफावती ची रक्कम एक कोटी 92 लाख 25 हजार रुपये तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील पावतीची रक्कम दोन कोटी 49 लाख 90 हजार रुपये,अशी मिळून एकूण पाच कोटी 57 लाख 2882 रुपये इतक्या रकमेचा संगनमत करून परस्पर अपहार केला आहे.
याबाबत बँकेचे जनरल मॅनेजर अरविंद हरीलाल नाझरकर (वय ६७,रा. हजारे गल्ली, मंगळवेढा) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र तपास पथके नियुक्त केली असून, लवकरच दोन्ही आरोपींना जेरबंद करू.असे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले. तब्बल पाच कोटींची रक्कम हडपल्या ची तक्रार दाखल झाल्याने बँकींग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा