शाळेतील वातावरणावर प्रश्नचिन्ह
शिरूर प्रतिनिधी; फैजल पठाण
शाळा म्हणजे संस्कारांचं मंदिर अशी ओळख असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्येच जर शिक्षकांकडून गलिच्छ, अश्लील भाषेचा वापर होत असेल, तर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? अशाच एका चिंताजनक प्रकरणात येथील श्री. वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील शिक्षक गणेश वेताळ यांनी एका पालकाला अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद भाषेत बोलावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
श्री. बालाजी श्रीरंग कांबळे, मांडवगण फराटा येथील रहिवासी आणि तक्रारदार पालक, यांचा मुलगा श्रेयश इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे. दिनांक ३० जुलै २०२५ रोजी, डबा पोहोचवण्यासाठी शाळेत आले असताना, कांबळे यांना शाळेच्या गेटवर कोणताही कर्मचारी किंवा शिपाई आढळून आला नाही. काही वेळाने शिक्षक गणेश वेताळ गेटवर आले आणि त्यांनी कोणत्याही कारणाविना, कांबळे यांच्याकडे पाहत, “आले का आमच्यावर उडायला?” अशा प्रकारची भाषा वापरत वादाची सुरुवात केली.
“तुला लय माज आलाय... तुझा कार्यक्रम करूच” – धमकीच्या स्वरात संवाद कांबळे यांनी शांतपणे “सर, तुम्ही असं बोलू नका” असं म्हणताच, शिक्षक गणेश वेताळ यांनी अधिकच संतप्त होत, अर्वाच्य, गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली. “तुला लय माज आलाय... तुझ्या तक्रारी मी विसरलो नाही... मीच तुझा कार्यक्रम करणार” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी धमकी दिल्याचे कांबळे यांनी लेखी तक्रारीत नमूद केले आहे.
या सर्व प्रसंगाच्या साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या दोन इतर पालकांनीही – श्री. मोहन शेलार आणि श्री. नारायण साळवे – हे प्रकार पाहिले असल्याचे सांगितले आहे.
शाळेच्या शिस्तीला धक्का?
हा प्रकार घडल्यानंतर कांबळे यांनी शिक्षण संस्थेचे सचिव श्री. नंदकुमार निकम आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, या संभाषणादरम्यानही वेताळ यांनी उद्दामपणे, “माझं नाव वेताळ आहे, सांगा त्या सचिवाला, मी कोणालाच भीक घालत नाही” असे वक्तव्य केले.
पूर्वीचाही वादग्रस्त इतिहास
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, शिक्षक गणेश वेताळ यांचा पूर्वीही वादग्रस्त इतिहास आहे. एक वर्षांपूर्वी त्यांनी शाळेच्या वेळेत दारू पिऊन येण्याचे प्रकार केले असून, काही महिन्यांपूर्वी देखील त्यांनी एका पालकाशी अश्लील भाषेत वर्तन केल्याचे सांगितले गेले होते.
शैक्षणिक संस्थेत अश्लीलता – विद्यार्थी काय शिकतील?
शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतो. मात्र जर शिक्षकच सार्वजनिक ठिकाणी पालकांशी अश्लील, गलिच्छ भाषेत वागत असेल, तर त्याचा परिणाम केवळ संबंधित व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. याचा खोल परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि शाळेच्या एकूण वातावरणावर होतो.
कारवाईची मागणी
या प्रकरणी पालक श्री. कांबळे यांनी संबंधित शिक्षकाच्या सखोल चौकशीची आणि त्वरित बडतर्फीची मागणी केली आहे. शाळा प्रशासन, शिक्षण संस्था, तसेच स्थानिक पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीच्या प्रतींत सर्व हकिगत नमूद करण्यात आली आहे.
शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांनी भाषेची आणि वागणुकीची मर्यादा राखणं गरजेचं आहे. शिक्षकांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी, अशा घटनांवर वेळेत कठोर पावलं उचलणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा