वाहतुकीचा खेळखंडोबा - प्रशासन मात्र सुस्त
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाई नगरीत आता अतिक्रमणाने अक्षरशः कळस गाठला आहे. कृष्णा नदीवरील, श्री महागणपती मंदिराला जोडून असलेल्या महत्त्वाच्या पुलावर दोन्ही बाजूंनी अनधिकृत, बेकायदा आणि विनापरवाना दुकाने थाटल्यामुळे वाहतुकीचा पार खेळखंडोबा झाला आहे. या बेजबाबदारपणामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पुलासारख्या संवेदनशील ठिकाणी, जेथे दररोज हजारो वाहने आणि भाविकांची ये-जा असते, त्याच रस्त्यावर अनेक विक्रेत्यांनी कायमस्वरूपी दुकाने थाटली आहेत. या अनधिकृत दुकानांमुळे पुलाची रुंदी निम्मी झाली आहे. पुलावरून एकाच वेळी केवळ एकच मोठे वाहन कसेबसे पुढे सरकू शकते. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
पुलावर होणाऱ्या गर्दीमुळे लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करणेही अशक्य बनले आहे. ऐतिहासिक महागणपती मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या बेशिस्तपणामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहराची प्रतिमा यामुळे मलीन होत आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन आणि पोलीस विभाग या गंभीर प्रश्नाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या अतिक्रमणामागे कोणाचे आशीर्वाद आहेत का?’, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. हे बेकायदा अतिक्रमण तात्काळ आणि कठोरपणे हटवावे. अन्यथा, प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिक आणि व्यापारी संघटनांनी दिला आहे. रस्त्यावर विक्रेत्यांनी मांडलेल्या सामानामुळे आणि त्यांच्याजवळ थांबलेल्या ग्राहक व नागरिकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दुचाकीस्वार आणि इतर वाहने कशीबशी वाट काढताना दिसत आहेत. येथील विक्रेते, ग्राहक आणि रस्त्यावरून जाणारी वाहने यामुळे या पुलाचे स्वरूप रस्त्यापेक्षा बाजारपेठेसारखे अधिक झाले आहे. जिथे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी फलक लावले आहेत, त्याच ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रशासन 'डोळेझाक' का करत आहे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ही केवळ दुकाने नाहीत, हा प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा आणि भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा आहे! श्री महागणपती मंदिराशेजारील पुलावर बेकायदा दुकाने थाटून वाहतुकीचा गळा घोटणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, प्रशासनाने 'नो पार्किंग'चे फलक लावून केवळ औपचारिकता पूर्ण केली आहे. या फलकासमोरच सुरू असलेला अतिक्रमणधारकांचा नंगा नाच पाहून, 'हा फलक नियमांसाठी आहे की वसुलीसाठी?', असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
पुलावर लावलेला 'येथे वाहने लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल' हा इशारा देणारा फलक केवळ शोभेसाठी आहे. त्याच फलकाच्या जवळ बेधडकपणे वाहने लावली जात असतानाही, कारवाईसाठी एकही प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी फिरकत नाही. नगरपालिका प्रशासन तर आहे की नाही? असा सवाल नागरिक आणि पर्यटक विचारत आहेत. नागरिकांच्या तीव्र मागणीकडे दुर्लक्ष करणे आणि पुराव्यासह अतिक्रमण दिसत असूनही कारवाई न करणे, यामागे मोठा आर्थिक व्यवहार दडलेला असल्याचा स्पष्ट आरोप स्थानिक करत आहेत. वरिष्ठांचे 'आशीर्वाद' असल्याशिवाय हे बेकायदा साम्राज्य असे खुलेआम फोफावू शकत नाही! वाहतूक कोंडीमुळे पुलावर अपघाताचे गंभीर धोके निर्माण झाले आहेत.
यातून कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास, त्याला जबाबदार कोण?, प्रशासनाचे झोपी गेलेले अधिकारी की हप्तेखोर कर्मचारी?, वाई शहर कोणाच्या इशाऱ्यावर चालले आहे?, नगरपालिकेचे प्रमुख कधी जागे होणार?, पोलीस अधीक्षक या रस्त्यावरील बेशिस्तीची आणि नागरिकांच्या त्रासाची दखल कधी घेणार? असे एक ना अनेक प्रश्न स्थानिक नागरिक विचारताना दिसून येत आहेत. वाईच्या सौंदर्याला आणि शिस्तीला आव्हान देणाऱ्या या बेकायदा राजकारणावर त्वरित 'सरकारी हातोडा' पडायलाच हवा! अन्यथा, या निष्क्रिय प्रशासनाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














