सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९७.९२ टक्के मतदान - आता उत्सुकता निकालाची

अकराही तालुक्यांत शांततेत मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईत १०० टक्के मतदानाची नोंद; सहा टेबलवर दोन फेऱ्यांत मतमोजणी, ३ नोव्हेंबरला निकालाचा फैसला.

Satara District Bank Elections, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (शुभम कोदे)

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सातारा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६ साठी रविवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या निर्धारित वेळेत एकूण २०२१ मतदारांपैकी १९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जिल्ह्यात ९७.९२ टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे कोरेगाव, खंडाळा आणि वाई या तीन तालुक्यांत शंभर टक्के मतदान झाले. आता सर्वांचे लक्ष सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सातारा तालुक्यात ४७३ पैकी ४६७ (९८.७३ टक्के), जावली ६९ पैकी ६५ (९४.२० टक्के), महाबळेश्वर ५१ पैकी ४६ (९०.२० टक्के), कराड ३३६ पैकी ३३० (९८.२१ टक्के), पाटण १९९ पैकी १९७ (९८.९९ टक्के), कोरेगाव १२७ पैकी १२७ (१०० टक्के), खटाव १५० पैकी १४५ (९६.६६ टक्के), माण १२३ पैकी ११९ (९६.७४ टक्के), खंडाळा ८८ पैकी ८८ (१०० टक्के), वाई १४२ पैकी १४२ (१०० टक्के) आणि फलटण तालुक्यात २६३ पैकी २५३ (९६.१९ टक्के) मतदान झाले. एकूण मतदान करणाऱ्यांमध्ये १६१ महिला आणि १८१८ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे स्वतः संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांनी मतदान प्रक्रियेसाठी चोख व्यवस्था केली होती. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात आणि राहुल देशमुख यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. प्रशासनाच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे मतदान प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण झाली.

मतपेट्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली; सुरक्षा कक्षात ठेवणार

अकराही तालुक्यांतील मतदान केंद्रांवरील मतपेट्या सातारा येथे आणून सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., जरंडेश्वर नाका, हनुमान मंदिराजवळील मतमोजणी केंद्रावर संकलित करण्यात येणार आहेत. त्यानंतर या मतपेट्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार असून, या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

३ नोव्हेंबरला सकाळी आठपासून मतमोजणी; सहा टेबलवर दोन फेऱ्या

सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी आठ वाजता सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., सातारा यांच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वप्रथम निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर मतपेट्या उघडण्यात येतील. त्यानंतर मतपेट्यांमधील मतपत्रिका वेगवेगळ्या करून मतदारसंघनिहाय त्यांचे गठ्ठे तयार करण्यात येणार आहेत. प्रथम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील मतपत्रिकांमधील मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर राखीव व औद्योगिक मजूर मतदारसंघाची मतमोजणी करण्यात येणार आहे.

मतमोजणी प्रतिनिधींसाठी आठ-अ नमुन्यात अर्ज आवश्यक

मतमोजणी केंद्रावर केवळ निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी आठ-अ नमुन्यातील अर्ज मतमोजणी सुरू होण्यापूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रात येताना आपले ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

अकराही तालुक्यांत उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेले मतदान, ९७.९२ टक्क्यांची नोंद आणि शांततेत पूर्ण झालेली निवडणूक प्रक्रिया यानंतर आता जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित कोणाच्या बाजूने झुकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ३ नोव्हेंबरच्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !