धर्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेत पालक सभा उत्साहात संपन्न; शाळेच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार
धर्मपुरी (ता. माळशिरस) : येथील जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्तीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी आयोजित पालक सभेत नवीन समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी तानाजी जगन्नाथ ठेंगील, तर उपाध्यक्षपदी जुलेका बुढन मुलाणी यांची निवड झाली.
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्तीच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालकांच्या उत्स्फूर्त सहभागातून नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.
नवीन समितीच्या सदस्यपदी माधुरी चंद्रकांत ठेंगील, प्रगती विकास झेंडे, सुमन अमित जैन, स्नेहा सुहास धायगुडे, धनाजी सुखदेव ठेंगील, सचिन श्रीकांत जैन, सचिन दत्तात्रय जगदाळे आणि उर्मिला विकास धायगुडे यांची निवड करण्यात आली. शिक्षणप्रेमी प्रतिनिधी म्हणून धनाजी जमादार झेंडे यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ग्रामपंचायत सदस्य, दोन विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षक प्रतिनिधी यांचाही समितीत समावेश आहे. मार्गदर्शक म्हणून आप्पा धायगुडे यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध व्हावे आणि भौतिक सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी नूतन समितीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीमुळे जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्तीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
----------------
----------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



