वाईच्या मैदानावर चिमुकल्यांचा क्रीडाविजयाचा जल्लोष! विविध क्रीडा प्रकारांत शाळांची दमदार कामगिरी

स्व.यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
School sports competition, Yashwantrao chavhan, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - मैदानावर धावण्याचा वेग, कबड्डीतील चढाया, खो-खोचा थरार, लंगडीचा खेळकर उत्साह आणि बुद्धिबळातील बुद्धिकौशल्य... अशा बहुरंगी क्रीडा आविष्कारांनी किसनवीर महाविद्यालयाचे मैदान अक्षरशः गजबजून गेले. निमित्त होते स्व. यशवंतराव चव्हाण वाई तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६ चे! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेत ५०० हून अधिक चिमुकल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची चमक दाखवली.

स्पर्धेचे उद्घाटन वाई पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी, क्रीडा स्पर्धा या केवळ विजय-पराजयापुरत्या मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचे प्रभावी माध्यम आहेत. मैदानावर घडलेला खेळाडू आयुष्यात कधीच हरत नाही, असे प्रतिपादन केले. 

जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव शिंदे यांनी ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना अशा स्पर्धांमुळे आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते, असे सांगून आयोजकांचे कौतुक केले. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा जगताप, पंचायत समिती सदस्य शैलेश सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांघिक क्रीडा प्रकारांत विविध शाळांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. लंगडीमध्ये वाघजाईवाडी व शेंदुरजणे, कबड्डीमध्ये वाशिवली व बावधन, तर खो-खोमध्ये बावधनच्या मुला-मुलींच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. रस्सीखेचमध्ये कुसगाव, शेंदुरजणे, किकली व पांडेवाडी यांनी बाजी मारली. ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत शेंदुरजणे, किकली व बावधनच्या संघांनी जेतेपद मिळवले.

धावण्याच्या स्पर्धांमध्ये १०० मीटरमध्ये रोहन वाघे, स्वरांजली जगताप, सार्थक ढमाळ व सई फरांदे; २०० मीटरमध्ये वरद इथापे, वेदिका भोसले, श्रवण चव्हाण व प्रज्ञा वाघमारे; ४०० मीटरमध्ये ओम धायगुडे, त्रिशा बाबर, साहिल कदम व प्रगती पवार यांनी विजेतेपद मिळवले.

६०० मीटरमध्ये हर्ष चिकणे, दुर्वा हगवणे, श्रेयश कांबळे व आर्या सातपुते, तर ८०० मीटरमध्ये मनीष गाढवे व प्रांजली मुसळे यांनी यश संपादन केले.

लांब उडीमध्ये आदित्य पिसाळ, परी वाडकर, सोहम वाडकर व जान्हवी काळंगे यांनी बाजी मारली. योगासनांमध्ये स्वराज गाढवे, श्रुती कदम, स्वराज ठोंबरे व ईश्वरी भिलारे यांनी अव्वल कामगिरी केली. बुद्धिबळात आराध्य माने, सृष्टी फाळके, श्लोक सपकाळ व ज्ञानेश्वरी चिकणे यांनी आपले कौशल्य सिद्ध केले. थाळीफेकमध्ये अनुज चव्हाण व श्रावणी पिसाळ, तर गोळाफेकमध्ये यश पवार व आरोही भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व शाळांचे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, वृषाली चव्हाण, पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड, राणी पवार, डॉ. सुरभी भोसले व हर्षदा फरांदे यांनी अभिनंदन केले.

गटविकास अधिकारी नारायणराव घोलप, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे व शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख निर्मला भांगरे, कविता नेवसे, क्रांती तापकीर, नवनाथ मालुसरे, वीरधवल भिलारे, शांताराम मालुसरे, विशाल गिरी, विध्येश गाडे, प्रशांत भोसले तसेच क्रीडा समन्वयक शिवाजी निकम, शरद यादव, शंकर सूर्यवंशी, अरुण भोये, प्रमिला राठोड, क्रीडा शिक्षक, पंच व मार्गदर्शक यांनी विशेष परिश्रम घेतले.

आभारप्रदर्शन जिल्हा क्रीडा समन्वयक शिवाजी निकम यांनी केले, तर सूत्रसंचालन शरद यादव यांनी केले. शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही क्रीडा स्पर्धा वाई तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातील लक्षवेधी पर्व ठरली.

-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !