भुईंज पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीदरम्यान आयोजित तक्रार निवारण दिनात २० तक्रारींचे जागेवरच निरसन

वार्षिक तपासणीत लोकसंवादावर भर; स्थानिक सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सुरज गुरव यांच्या सूचना
Organization of a Grievance Redressal Day, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)

प्रशासकीय तपासणीसोबतच थेट लोकसंवाद; पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाने 'पोलिसांचे डोळे व कान' बनून काम करण्याचे सुरज गुरव यांचे आवाहन

भुईंज पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनात तब्बल २० तक्रारींचे जागेवरच निरसन करण्यात आले. या उपक्रमात परिसरातील १०० ते १५० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाला प्रभावी आणि जबाबदारीच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेतली. यावेळी पोलीस पाटील यांनी गावपातळीवर अधिक सक्रिय राहून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, गावातील घडामोडी, संशयास्पद हालचाली तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींबाबत तत्काळ माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

तसेच गावांमध्ये ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून रात्रीची गस्त अधिक प्रभावीपणे वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटलांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन पोलीस पाटलांची निवड करून जिल्हास्तरावर पोलीस दलामार्फत त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

महिला सुरक्षिततेच्या अनुषंगानेही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन महिलांशी संबंधित तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, महिलांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्या तक्रारी पोलिसांकडे मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले. तसेच कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला न्याय मिळेल, या दृष्टीने पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्यानंतर आयोजित तक्रार निवारण दिनामध्ये नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेण्यात आले. संबंधित तक्रारींमध्ये दोन्ही बाजूंना समोरासमोर बोलण्याची संधी देऊन समन्वयाने व कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये एकूण २० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिकांच्या प्रलंबित समस्यांना तत्काळ दिलासा मिळाला.

तक्रार निवारण दिनानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पोलीस ठाण्यातील अभिलेख, प्रलंबित तपास, गुन्हे उकल, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच पोलीस ठाण्याच्या परिसराची पाहणी केली. अधिकारी व अंमलदार यांना कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.

गावातील प्रत्येक लहान-सहान घडामोडींची माहिती वेळेत मिळणे ही कायदा-सुव्यवस्थेसाठी महत्त्वाची बाब आहे. पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दलाने अधिक सतर्क राहून पोलीस यंत्रणेचे डोळे व कान म्हणून काम करावे." 

 सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक


वार्षिक तपासणीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या तक्रार निवारण दिनामुळे नागरिकांच्या २० तक्रारींचे जागेवरच निरसन होऊन पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय व विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, महिला सुरक्षितता, ग्रामसुरक्षा दलाचे बळकटीकरण आणि प्रभावी पोलीस प्रशासन या बाबींना भुईंज पोलीस ठाण्याच्या वतीने प्राधान्य देण्यात येत आहे.

पृथ्वीराज ताटे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुईज पोलीस स्टेशन
     

 

Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !