इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (शुभम कोदे)
जावळीच्या निसर्गरम्य भूमीत आयोजित करण्यात आलेल्या 'टॉप गिअर जावळी जोडी रन' (१० किमी) या अनोख्या धावण्याच्या उपक्रमाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले. या विक्रमी यशामुळे जावळीसह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, आयोजक, धावपटू आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
'Unique Concept, Scenic Route' या संकल्पनेवर आधारित आयोजित जोडी रनमध्ये मोठ्या संख्येने धावपटू व त्यांच्या जोडीदारांनी सहभाग घेतला. निसर्गरम्य मार्ग, उत्साह, शिस्त आणि सामाजिक संदेशांची सांगड घालत हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर 'भारत माता की जय', 'जय शिवाजी' आणि 'हर हर महादेव'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वंभरबाबा आध्यात्मिक शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मृदंगाच्या गजरात उपस्थित होते. मृदंगाच्या तालावर आणि जयघोषात स्पर्धकांना मिळालेल्या प्रोत्साहनामुळे स्पर्धेतील वातावरण अधिक उत्साहपूर्ण बनले.
स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी पारंपरिक वेशभूषा, शेती, निसर्गसंवर्धन तसेच विविध सामाजिक विषयांवरील संदेशफलकांच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश दिला. केवळ धावण्याची स्पर्धा न राहता आरोग्य, सामाजिक बांधिलकी, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
या ऐतिहासिक कामगिरीच्या गौरव सोहळ्यात 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२६' आणि 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ची प्रमाणपत्रे व पदके प्रदान करण्यात आली. आयोजक मंडळ, टीम सदस्य, मार्गदर्शक, आश्रयदाते आणि उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मिनाक्षी हॉस्पिटलचे डॉ. प्रतापराव गोळे, शामली एंटरप्रायझेसचे प्रतिनिधी, दिशा डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. कैलास फडतरे यांचा विशेष उल्लेख करून मंचावर सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले. जोडी रनमधील प्रथम विजेतेपद सुनील जवळ व त्यांच्या सहकाऱ्याने पटकावले. त्यांच्या यशाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
मेढा ते सातारा या मार्गावर आयोजित या उपक्रमाने जावळीच्या पर्यटन, निसर्गसौंदर्य, क्रीडा संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांना नवी ओळख मिळवून दिली. दोन प्रतिष्ठित रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाल्याने या स्पर्धेचे महत्त्व आणखी वाढले आहे. जावळीच्या भूमीतून घडलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल आयोजकांनी सर्व धावपटू, स्वयंसेवक, मार्गदर्शक, आश्रयदाते आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











