सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माळशिरस सोसायटी मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
माळशिरस - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माळशिरस सोसायटी मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपप्रणीत पॅनलकडून बाबाराजे देशमुख, विरोधी पॅनलकडून अर्जुनसिंह मोहिते-पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या गटाकडून ज्ञानराज पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने माळशिरसमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, या लढतीतील खरी उत्सुकता तीन उमेदवारांपेक्षा जानकर गटाच्या राजकीय भूमिकेबाबत अधिक आहे. जानकरांची ही उमेदवारी मोहिते-पाटलांना रोखण्यासाठी आहे, की भाजपप्रणीत पॅनललाही आपली ताकद दाखवून देण्यासाठी? या प्रश्नाने माळशिरसच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जानकरांच्या स्वतंत्र उमेदवारीने राजकीय चर्चेला नवे वळण!
माळशिरसच्या राजकारणात मोहिते-पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यातील राजकीय संघर्ष आणि वेगवेगळ्या भूमिका यापूर्वीही अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी जानकर यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्याचवेळी मोहिते-पाटील यांच्याशी आपला राजकीय मार्ग वेगळा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जानकर गटाने स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरविणे ही केवळ निवडणुकीपुरती भूमिका नसून त्यामागे राजकीय संदेशही दडलेला असल्याची चर्चा आहे.
मोहिते-पाटलांसमोर नेमके कोणाचे आव्हान?
अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. दुसरीकडे भाजपप्रणीत पॅनलकडून बाबाराजे देशमुख यांनी आव्हान उभे केले आहे. अशातच ज्ञानराज पाटील यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.
जानकर गटाची स्वतंत्र राजकीय ताकद सहकारी संस्थांच्या मतदारांमध्ये किती प्रभावी ठरते, यावर या निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. जानकर गटाने मिळविलेली मते एखाद्या प्रमुख उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सुकर करू शकतात, तर दुसऱ्या उमेदवाराच्या विजयात अडथळाही ठरू शकतात.
बिनविरोधची चर्चा संपली; आता प्रतिष्ठेची लढाई!
उमेदवारी अर्ज दाखल करतानाच आमदार उत्तम जानकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. मात्र, बिनविरोध निवडीसाठी विचारणा झाल्यास सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली होती. परंतु, उमेदवारांमध्ये एकमत न झाल्याने ज्ञानराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले. परिणामी, माळशिरसमधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले.
निकालापेक्षा मतविभाजनाचीच अधिक उत्सुकता!
या निवडणुकीत बाबाराजे देशमुख यांची संघटनात्मक ताकद, अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचे राजकीय वर्चस्व आणि उत्तम जानकर यांच्या गटाची स्वतंत्र ताकद अशा तिन्ही बाजूंची कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे, ज्ञानराज पाटील यांना मिळणाऱ्या मतांची संख्या आणि त्या मतांचा संभाव्य परिणाम यावरच निकालाचे गणित ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील राजकीय वर्चस्वाची लढाई मानली जाते. त्यामुळे माळशिरसमधील ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.
जानकरांचा उमेदवार विजयाची बाजी मारणार, की मोहिते-पाटील आणि भाजपप्रणीत पॅनलमधील लढतीचे गणितच बदलणार? जानकरांची ताकद मतपेटीतून सिद्ध होणार की त्यांची उमेदवारी निर्णायक मतविभाजनाचे कारण ठरणार? माळशिरसच्या या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











