वाईच्या भाजी मंडईच्या सुशोभीकरणाला वेग - विक्रेत्यांसाठी पांढरे पट्टे आखण्याचे काम सुरू

शेड उभारणी पूर्णत्वास; शेडनेटचे काम अंतिम टप्प्यात, मात्र अनामत रक्कम आणि भाड्याबाबत विक्रेत्यांमध्ये संभ्रम

Beautification of the Vegetable Market, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( शुभम कोदे )

वाई शहरातील भाजी मंडईच्या सुशोभीकरणाच्या कामाला आता वेग आला असून, भाजी विक्रेत्यांना शिस्तबद्ध पद्धतीने व्यवसाय करता यावा यासाठी मंडई परिसरात पांढरे पट्टे आखण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी रविवारी भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेड उभारणीचे काम पूर्ण झाले असून, शेडनेटचे कामही लवकरच पूर्ण होणार असल्याने आधुनिक आणि नियोजनबद्ध भाजी मंडईचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

भाजी मंडईच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, वाई नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका तसेच पालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले की, भाजी मंडईतील शेड उभारणीचे काम पूर्ण झाले असून शेडनेटचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल. मंडई परिसर अधिक स्वच्छ, मोकळा आणि शिस्तबद्ध करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. भाजी विक्रेते, व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांनी मंडईतील शिस्त पाळून एकमेकांना सहकार्य करावे. सर्वांच्या सहभागातून वाई शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दरम्यान, काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी शेडचे काम चांगल्या प्रकारे झाले असले तरी त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले. या सूचनांची नगराध्यक्ष, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली.

उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के म्हणाले की, भाजी मंडईसह वाईकर नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विकासकामांची वाटचाल सुरू आहे.

अनामत रक्कम आणि भाड्याबाबत संभ्रम कायम!

एकीकडे भाजी मंडईचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असताना दुसरीकडे नव्याने उभारण्यात आलेल्या शेडमध्ये भाजी विक्रीसाठी जागा मिळविताना आकारण्यात येणारी अनामत रक्कम आणि मासिक भाडे याबाबत भाजी विक्रेते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आर्थिक बाबींबाबत स्पष्टता नसल्याने संबंधितांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन अनामत रक्कम व भाड्याबाबत अधिकृत माहिती द्यावी आणि सर्वांना मान्य होईल असा योग्य मार्ग काढावा, अशी मागणी विक्रेते आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे.

सुंदर आणि आधुनिक भाजी मंडई उभारण्याच्या प्रयत्नांना विक्रेत्यांचे सहकार्य मिळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांच्या आर्थिक अडचणी आणि शंकांचे निरसन होणेही आवश्यक आहे. त्यामुळे सुशोभीकरणाच्या कामासोबतच विक्रेत्यांच्या प्रश्नांवरही पालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता वाईकरांचे लक्ष लागले आहे.
       -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !