मौलाना आझाद विचार मंचचा स्तुत्य उपक्रम; खा. नितीन पाटील यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संस्कार आणि विचारांची पेरणी करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव वाई येथे करण्यात आला. मौलाना अबुलकलाम आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने मौलाना आझाद व फातिमा शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खा. नितीन पाटील यांच्या हस्ते शिक्षकांना गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बोलताना खा. नितीन पाटील म्हणाले की, समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण असते. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे ही काळाची गरज असून, मौलाना आझाद विचार मंचने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि स्तुत्य आहे,
देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद आणि भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांनी शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिक्षकांचा त्यांच्याच नावाने गौरव होणे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, 'किसन वीर'चे संचालक संदीप चव्हाण आणि सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुरस्काराने शिवाजी निकम, गुरुनाथ राठोड, ताजुद्दीन सय्यद, नसीमा बेद्रेकर, कृष्णा कांबळे, नम्रता गायकवाड, सबिहा पटेल, श्रीगणेश शेंडे, संभाजी लावंड आणि प्रशांत थोरवे यांना गौरविण्यात आले. यावेळी जयवंत आवटे यांनी शिक्षकांच्या विद्यार्थीभिमुख कार्याचा आणि समाजशीलतेचा गौरव केला. समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षक या जबाबदार घटकाला सन्मानित करून विचार मंचने एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्रा. महंमद शेख यांनी केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्याध्यक्ष मोअज्जम इनामदार यांनी आभार मानले. यावेळी दिलेरखान शिकलगार, संजय बागुल, रियाज काझी, संजय सकटे, जुबेर बागवान, प्रदीप नेवसे आदी उपस्थित होते.
----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











