वनविभागाच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश - पीडित कुटुंबाला भरपाई देण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा तालुक्यातील मालगाव शिवथर येथील न्हाळेवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. घराच्या अंगणात खेळणाऱ्या अवघ्या २६ महिन्यांच्या निष्पाप चिमुकल्याला बिबट्याने पळवून नेऊन ठार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. जय संदीप खंडागळे (वय २६ महिने) असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे न्हाळेवाडीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर तीव्र शोककळा पसरली असून, वन विभाग आणि महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याची झेप
मिळालेल्या माहितीनुसार, न्हाळेवाडी येथील बौद्ध वस्तीच्या पाठीमागील ओढ्याच्या परिसरात सायंकाळी ७:१५ ते ७:३० च्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. परिसरात अंधार पसरताच आधीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंगणात खेळणाऱ्या २६ महिन्यांच्या जयवर अचानक हल्ला केला. बिबट्याने क्षणात त्याला तोंडात धरून पाठीमागील शेत व ओढ्याच्या दिशेने ओढत नेले.
रक्ताच्या ठिपक्यांवरून शोध; तातडीचे प्रयत्न ठरले निष्फळ
मुलाला बिबट्याने पळवल्याचे लक्षात येताच गावातील तरुणांनी अत्यंत धैर्याने अंधारातच बॅटऱ्या आणि काठ्या हातात घेऊन धाव घेतली. जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या ताज्या ठिपक्यांवरून ग्रामस्थ पुढे सरकत गेले. बौद्ध वस्तीमागील ओढ्यात काटेरी झुडपांमध्ये बिबट्या बालकाला घेऊन बसलेला दिसताच तरुणांनी मोठा आरडाओरडा करून त्याला पळवून लावले. मात्र, बिबट्याच्या तीक्ष्ण दातांमुळे आणि पंजाच्या गंभीर हल्ल्यामुळे चिमुरडा जय छिन्नविछिन्न आणि गंभीर जखमी झाला होता. त्याला वाचवण्यासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
"आम्ही ओरडून सांगत होतो, वनविभाग झोपला होता!"
या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सातत्याने वाढला होता. पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांनी वनविभागाला वारंवार तोंडी व लेखी निवेदने देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. "वनविभागाने वेळेवर गस्त घातली असती किंवा पिंजरा लावला असता, तर आज एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेला नसता," असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ऐन संध्याकाळी होणारा वीज पुरवठा खंडित होणे आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळेच हा बळी गेल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
या दुर्देवी घटनेनंतर न्हाळेवाडी व लगतच्या वाड्या-वस्त्यांवर भीतीचे सावट पसरले आहे. शेतात कामाला जाणेही धोक्याचे बनले आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन या बिबट्याला 'नरभक्षक' घोषित करावे आणि ठिकठिकाणी पिंजरे लावून त्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास आणि बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास वनविभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











