हजारो नागरिकांना जागेवरच शिधापत्रिका, ई-केवायसीसह विविध सुविधा
पुरवठा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्राचे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार पाटण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने तारळे, मल्हारपेठ आणि ढेबेवाडी येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिकांनी विविध शासकीय सुविधांचा लाभ घेतला.
या विशेष कॅम्पमध्ये दुबार शिधापत्रिका दुरुस्ती, नवीन सदस्यांची नावे वाढविणे, शिधापत्रिकेवरील नावे कमी करणे तसेच ई-केवायसी अशा विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाटण तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहिली नाही.
नागरिकांच्या वेळेची आणि श्रमांची बचत होण्याबरोबरच पुरवठा विभागाच्या सेवा थेट गावपातळीवर पोहोचल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. अनेक नागरिकांनी कॅम्पच्या माध्यमातून प्रलंबित कामे जागेवरच पूर्ण करून घेतली.
ढेबेवाडी विभागाच्या वतीने सीताई स्वयंसहायता समूह, तळमावलेच्या अध्यक्षा कविता कचरे यांनी उपस्थित नागरिकांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, स्वयंसहायता समूहाच्या पदाधिकारी आणि सर्व संबंधितांचे आभार मानले.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय पुरवठा सेवांचा लाभ अधिक सुलभ, जलद आणि त्यांच्या गावाजवळ मिळावा, या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कॅम्पमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











