एका प्रकरणात ३ हजार २०० रुपयांचा माल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई मांढरदेव (ता. वाई) येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. गावातील दोन किराणा दुकानांची तपासणी केली असता विक्रीसाठी प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आला. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
दुपारी १२:३० वाजता चेतन किराणा स्टोअर येथे करण्यात आलेल्या तपासणीत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. यामध्ये विमल पानमसाला, किंग पॅक, व्ही टोबॅको आणि एम सेंटेड टोबॅको यांसारख्या पदार्थांचा समावेश असल्याचे नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अल्पना अविनाश गायकवाड यांनी तक्रार दिली असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार, या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ३ हजार २०० रुपये आहे.
दुसरी कारवाई मांढरदेव येथील शिवम किराणा व कोल्ड ड्रिंक्स या दुकानात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी विक्रीसाठी प्रतिबंधित विमल पानमसाल्याच्या विविध प्रकारांचा साठा आढळून आला. याप्रकरणी दुकानाशी संबंधित जीवन बबन मांढरे (वय ३८, रा. मांढरदेव, ता. वाई, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रियंका नामदेव वाईकर यांनी याबाबत तक्रार दिली.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ आणि संबंधित नियमांनुसार दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि साठवणूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास वाई पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











