पवित्र महागणपती घाटाचा बनला धोबी घाट - प्रशासनाचे डोळेझाक धोरण - ढोल्या गणपती मंदिराच्या दारातच कपड्यांचा ढीग

कृष्णामाईच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह, प्रशासन आणि मंदिर संस्थान मात्र जबाबदारी झटकण्यात मग्न
Bad condition, Ganpati Ghat, Dhobi Ghat, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई येथील प्रसिद्ध श्री महागणपती अर्थात 'ढोल्या गणपती' मंदिर परिसरातील पवित्र महागणपती घाटाची सध्या अक्षरशः ‘धोबी घाट’ अशी दुर्दैवी अवस्था झाली आहे. मंदिराच्या अगदी शेजारी असलेल्या घाटावर बेडशीट, चादरी, वाकळा, चटया आणि कपड्यांचे ढीग सुकत घालण्याचे प्रकार सर्रास सुरू असून, यामुळे परिसराचे धार्मिक पावित्र्य धोक्यात आले आहे.

घाटावर एका बाजूला नदीपात्रात कपडे धुणे आणि खरकटी भांडी स्वच्छ करणे सुरू असते, तर दुसऱ्या बाजूला त्याच पवित्र पाण्यात भाविक स्नान करत असतात, असे विसंगत आणि संतापजनक चित्र समोर येत आहे. त्यामुळे महागणपती घाट आणि कृष्णामाईचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.

देवाच्या दारातच अस्वच्छतेचा बाजार
धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या वाई शहरात स्वच्छता आणि शिस्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे. श्रद्धेने श्री महागणपती व कृष्णामाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना घाटावर अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. धार्मिक स्थळांच्या पावित्र्याच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्षात मात्र नियमांची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरत आहे.

तात्पुरत्या लोखंडी पुलाचा झाला 'वाळवण घाट'
काही महिन्यांपूर्वी लघुकुंभमेळ्यासाठी कृष्णा नदीवर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या लोखंडी पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर कपडे वाळत घातले जात आहेत. धार्मिक आयोजनासाठी उभारलेल्या सार्वजनिक मालमत्तेचा असा चुकीचा वापर होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.

प्रशासनाकडून जबाबदारीची ढकलपट्टी
महागणपती मंदिर परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असतानाही मंदिर प्रशासन आणि कृष्णामाई संस्थान प्रशासनाकडून कोणतेही ठोस निर्बंध घातले जात नाहीत. घाटावरील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी नक्की कोणती यंत्रणा कार्यरत आहे, याचे उत्तर मिळणे कठीण झाले असून दोन्ही प्रशासनांकडून एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली जात आहे.

पत्रकाराला उद्धट वागणूक; सामान्य भाविकांचे काय?
घाटावरील या दुरवस्थेबाबत मंदिरातील देणगी कार्यालयात उपस्थित असलेल्या 'वाडकर' नामक व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्यांनी वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारालाच मोठ्या आवाजात उद्धट उत्तरे दिल्याची घटना घडली. "हा विषय मंदिर प्रशासनाचा नसून कृष्णामाई संस्थानचा आहे," असे सांगत त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्य भाविकांच्या तक्रारींची दखल कशी घेतली जात असेल, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सेवाभावी संस्थांचे कष्ट वाया
'कृष्णा नदी सेवा कार्य फाउंडेशन'चे कार्यकर्ते दर रविवारी स्वयंप्रेरणेने घाटाची स्वच्छता करतात. पालिका प्रशासनही विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगते. मात्र, एका बाजूला स्वच्छता करायची आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांनी पुन्हा अस्वच्छता निर्माण करायची, या प्रकारामुळे स्वयंसेवकांच्या कष्टांवर पाणी फिरले जात आहे.

घोटवडेकर हॉस्पिटलमागे उकिरड्याचे स्वरूप
ही समस्या केवळ महागणपती घाटापुरती मर्यादित नसून घोटवडेकर हॉस्पिटलच्या पाठीमागील नदीकाठावर कचऱ्याचे ढीग साचल्याने त्याला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. कचऱ्याची नियमित उचल न झाल्याने परिसरातील सार्वजनिक आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

प्रत्यक्ष कृतीची गरज!
वाई हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांवर या अस्वच्छतेमुळे वाईट परिणाम होत आहे.
घाटावर धुणीभांडी करण्यास बंदी घालणारे स्पष्ट नियम लागू होणार का?
नदीकाठावरील कचरा कधी हटवला जाणार?
पत्रकाराशी उद्धट व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?
या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला द्यावीच लागतील; अन्यथा वाईच्या सुंदर व स्वच्छ प्रतिमेचा केवळ कागदावरच गजर राहील, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !