केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा सकारात्मक प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे लवकरच एक नवीन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुरू होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पुणे येथील शासकीय विश्रामगृहावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पंढरपूर येथे नियोजित असलेल्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या उभारणीबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
ग्रामीण भागातील शिक्षणाला आणि आरोग्य सेवांना मिळणार बळ
पंढरपूरसारख्या जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुरू झाल्यास पंढरपूरसह संपूर्ण परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची हक्काची व सोयीची संधी उपलब्ध होईल, असा जोरदार मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला. तसेच, या प्रकल्पामुळे परिसरातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मोठी मदत होईल, अशी भूमिकाही यावेळी स्पष्ट करण्यात आली.
केंद्रीय मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
दिलीप बापू धोत्रे यांनी मांडलेल्या या महत्त्वपूर्ण भूमिकेला आणि प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याला नवी दिशा मिळणार असून, लवकरच पंढरपूर येथे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली आहे. या संभाव्य प्रकल्पामुळे पंढरपूरच्या शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











