गाई, बैल, म्हशी आणि शेळ्यांना मिळणार विमा संरक्षण; अवघ्या काही दिवसांत ५५ पशूंचा विमा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - पशुपालकांना आर्थिक संकटाच्या काळात आधार मिळावा आणि पशुधनाला विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्यातील पशुविमा योजनेचा शुभारंभ वाई तालुक्यातील बावधन येथे करण्यात आला. बावधन येथील अजय अरविंद दाभाडे यांच्या गाईंचा विमा उतरवून या योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विम्याच्या एकूण हप्त्यापैकी तब्बल ८५ टक्के रक्कम शासन भरणार असल्याने पशुपालकांना केवळ १५ टक्के रक्कम भरून आपल्या पशुधनाला विमा संरक्षण मिळवता येणार आहे.
या योजनेअंतर्गत गाई व बैलांसाठी प्रति जनावर कमाल ७० हजार रुपये, म्हशींसाठी ८० हजार रुपये, तर शेळीसाठी ७ हजार रुपये इतकी कमाल किंमत निर्धारित करण्यात आली आहे. जनावरांच्या निर्धारित किमतीच्या ४.३ टक्के दराने एका वर्षासाठी विमा हप्ता आकारला जाणार आहे. या हप्त्यापैकी ८५ टक्के रक्कम शासनाकडून अदा केली जाणार असून उर्वरित १५ टक्के रक्कम लाभार्थी पशुपालकाला भरावी लागणार आहे. त्यामुळे कमी खर्चात पशुधनाला विमा संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाची देखभाल, चारा नियोजन आणि पशुपालकांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर पशुविमा योजनेमुळे पशुपालकांना आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा आधार मिळणार आहे. पशुधनाचे नुकसान झाल्यास आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.
जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या प्रारंभानंतर अल्पावधीतच ५५ पशूंचा विमा उतरविण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे.
गाई, बैल, म्हशी तसेच शेळी-मेंढीपालकांनी आपल्या पशुधनाचा विमा उतरवून आर्थिक सुरक्षितता मिळवावी. यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाई तालुका प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे डॉ. सुनील देशपांडे यांनी केले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











