ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा दबावाला विरोध
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील काही बांधकामांच्या मालमत्ता नोंदीत ‘अनधिकृत बांधकाम’ असा शेरा नोंदविण्यात आल्याने वादाला नवे वळण मिळाले आहे. हा शेरा काढून बांधकामांची नोंद करून घेण्याच्या मागणीसाठी संबंधितांकडून पंचायत समिती प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने केला आहे. या मागणीवरून संबंधितांनी पंचायत समिती, वाईसमोर उपोषण करण्याचा इशारा दिल्याने प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
मिळालेल्या कागदपत्रांनुसार, यशवंतनगर येथील लहू बळवंत सावंत, पंढरीनाथ सखाराम घाटे व गणेश दत्तात्रय सावंत यांनी १५ सप्टेंबर २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. संबंधित इमारतींची ग्रामपंचायत दप्तरी कायदेशीर पद्धतीने नोंद करून घ्यावी, अशी त्यांची मागणी असल्याचे निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संबंधित बांधकामांना आवश्यक शासकीय परवानगी व नियमांचे पालन झाले नसल्याने मालमत्तांच्या नमुना क्रमांक ८ मध्ये नोंद करताना ‘अनधिकृत बांधकाम’ असा शेरा नमूद करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी तसेच शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणी प्रक्रिया करण्यात आल्याची भूमिका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घेतली आहे.
अनधिकृत बांधकामाचा शेरा काढण्यासाठी गेल्या काही काळापासून विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. राजकीय दबाव, तक्रारी अथवा अन्य प्रकारे ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर दबाव आणणे योग्य नसून, नियमांनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना संबंधित शासन निर्णय, नियम तसेच बांधकामावर ‘अनधिकृत’ असा शेरा नोंदविण्याबाबत माहिती दिल्याचे संघटनेने म्हटले आहे. आवश्यक असल्यास पुन्हा माहिती देऊन नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत गटविकास अधिकारी, वाई यांना १६ सप्टेंबर रोजी कळविण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. “ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाबाबत नियमानुसार शेरा नोंदविला आहे. कायदा, शासन निर्णय आणि नियमांचे काटेकोर पालन करताना कोणताही दबाव आणू नये. नियमांनुसार काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी राहील,” असे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संदीप सावंत यांनी सांगितले.
संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी, वाई यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रामदास निंबाळकर, दिलीप जुनघरे, प्रमोद पोळ, शहाजी बोभाटे, मोहन कोळी, किरण निकम, संतोष अनगळ, दीपक जाधव, प्रशांत धुमाळ, मल्हारी शेळके, किरण पिसाळ, अतुल डेरे, अनिता धायगुडे, सुचित्रा राऊत, सुनीता राठोड यांच्यासह वाई तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना व वाई तालुका कृषी तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दबावाची कारवाई सुरू राहिल्यास तालुकास्तरावर कामबंद आंदोलन व तीव्र निदर्शने करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. त्यामुळे यशवंतनगरमधील बांधकामांच्या नोंदीचा प्रश्न आता प्रशासकीय पातळीवर कोणते वळण घेतो, याकडे लक्ष लागले आहे.
चौकशी, तपासणी आणि नियमानुसार कार्यवाहीचे निर्देशजिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांना शासन निर्णय व नियमांची माहिती दिल्याचे संघटनेने म्हटले आहे. आवश्यक असल्यास पुन्हा मार्गदर्शन करून नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत गटविकास अधिकारी, वाई यांना १६ सप्टेंबर रोजी कळविण्यात आले आहे.
प्रशासनासमोर आता दुहेरी आव्हान
एका बाजूला ‘अनधिकृत बांधकाम’ शेरा काढण्याची मागणी, तर दुसऱ्या बाजूला नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची भूमिका. त्यामुळे यशवंतनगरमधील हा प्रश्न केवळ बांधकाम नोंदीपुरता न राहता आता प्रशासनाच्या निर्णयक्षमतेचीही कसोटी ठरणार आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा












