शिरूरमध्ये दहशत - सलग तिसऱ्या गोळीबाराने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा - पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह

गणेशोत्सवातच तरुण उद्योजकाची हत्या करणाऱ्या तिघांना ४८ तासांत अटक, तीन दिवसांची पोलीस कस्टडी
Shirur firing incident raises questions about law and order, poplice, shirur, pune, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (फैजल पठाण)
गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि गौरी-गणपतीच्या आगमनादरम्यानच शिरूर शहरातील लाटे आळी, आंबेडकरनगर परिसरात हरिष दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक हत्याकांडानंतर अवघ्या ४८ तासांत शिरूर पोलिसांनी सुपा टोलनाका परिसरात सापळा रचून तीन आरोपींना जेरबंद केले. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असली, तरी अवघ्या तीन महिन्यांत घडलेल्या तिसऱ्या गोळीबाराच्या घटनेमुळे शिरूर शहरातील सुरक्षेचा आणि पोलिसांच्या धाकाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​नेमकी घटना काय?
१८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास लाटे आळी येथे हरिष गंगावणे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांच्या कानाच्या मागे आणि मानेच्या उजव्या बाजूस गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ८२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३, ३५१(२), ३५१(३), ३(५) आणि शस्त्र अधिनियम कलम ३, २५, २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

​सुपा टोलनाक्यावर 'डी.बी.' पथकाची धडक कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी परजिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने सुपा टोलनाका परिसरात सापळा रचला.

​या कारवाईत रोहित रविंद्र सोनवणे (वय २४, रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३) आणि आदित्य दादाभाऊ पवार (वय १९, दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. अटकेतील तिन्ही आरोपींवर यापूर्वीही अवैध गावठी पिस्तूल बाळगणे, मारहाण आणि जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

​नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न
आरोपींना ४८ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी गेल्या दोन-तीन महिन्यांत शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही गोळीबाराची तिसरी घटना आहे. यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे का? असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत. शहरात पोलिसांनी 'कोंबिंग ऑपरेशन' राबवल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यातून नेमके काय साध्य झाले, याबद्दल अनभिज्ञता आहे.

​आनंदोत्सवाच्या काळातच शहरात अशा रक्तरंजित घटना घडत असल्याने सामान्य नागरिकांना घराबाहेर पडताना सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे. केवळ गुन्हे घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, गुन्हेगारीला वेसण घालून शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी तीव्र भावना शिरूरकरांमधून व्यक्त होत आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शुभम चव्हाण व डी.बी. पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर करत आहेत.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !