२०१६ ते २०२५ दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नसल्याचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - महाराष्ट्र शासनाच्या तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी वाई नगरपरिषदेतील निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज नगरपरिषद कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाद्वारे निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष आपल्या प्रलंबित मागणीकडे वेधले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ११ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन आदेशानुसार नगरपरिषद संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ १ जानेवारी २०१६ पासून लागू केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगरपरिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत असताना, १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या प्रश्नाबाबत गेल्या दोन वर्षांपासून मुख्याधिकारी तसेच आस्थापना विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांकडे वारंवार प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदने व मागण्या करण्यात आल्या. मात्र, अद्याप मागणीची दखल घेण्यात आलेली नसल्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडेही निवेदन सादर करण्यात आले असून, नगरपरिषद प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, लाभ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर आज नगरपरिषद कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनात वाई नगरपरिषदेतील अनेक निवृत्त कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांच्या मागणीवर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या१ जानेवारी २०१६ पासून लागू असलेल्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावा.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना योजनेनुसार मिळणाऱ्या आर्थिक लाभाची कार्यवाही तातडीने करावी.प्रलंबित लाभामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.शासनाच्या संबंधित आदेशाची नगरपरिषद स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











