सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद - २०० हून अधिक कामगारांची तपासणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व डॉ. हॅनिमन होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावरील कामगार भवन येथे सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले. शिबिराला अधिकारी व कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २०० हून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य तथा कारखान्याचे विद्यमान संचालक सर्जेराव (नाना) सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कामगार तसेच मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन यशवंतराव साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेवराव सावंत, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जिवाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. सावंत यांनी “कामगार हा कारखान्याचा कणा असून, त्यांचे आरोग्य उत्तम राहणे ही कारखान्याच्या प्रगतीची गरज आहे. आजार अंगावर न काढता नियमित आरोग्य तपासणी करावी,” असे आवाहन केले. डॉ. जवाहरलाल शहा यांनी वेळेत निदान व योग्य उपचाराचे महत्त्व स्पष्ट करत होमिओपॅथी उपचारपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. लेबर ऑफिसर ॲड. रणजित चव्हाण यांनी कामगार कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. जवाहरलाल शहा, डॉ. राहुल शिरकांडे, डॉ. अभयसिंह चव्हाण, डॉ. सुखदेव आपटे, डॉ. अभिजित कुचेकर, डॉ. अभिजित गुरव, डॉ. सेरा शहा व वैद्यकीय पथकाने तपासणी केली. कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘आरोग्यदायी कामगारशक्ती हीच सक्षम अजिंक्यताराची खरी ताकद’ या संदेशाने शिबिराचा समारोप झाला.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











