मुंबई शहराचा १३-९ असा पराभव करत सातारा जिल्ह्याला मिळवून दिले पहिले राज्यस्तरीय अजिंक्यपद
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाईच्या मुलींनी महाराष्ट्र राज्यस्तरीय हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत ऐतिहासिक राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले. नवी मुंबईतील खारघर येथील विभगोर हायस्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ज्ञानदीपच्या मुलींनी अंतिम सामन्यात मुंबई शहर संघाचा १३-९ गोलांनी पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील वाईच्या संघाने प्रथमच महाराष्ट्र राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले असून, या ऐतिहासिक कामगिरीमुळे ज्ञानदीप स्कूलसह संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ज्ञानदीपच्या संघाने पुणे संघावर ९-७ गोलांनी मात केली. त्यापूर्वी उपउपांत्य फेरीत मुंबई उपनगर संघाचा २०-४ गोलांनी धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात रायगड जिल्हा संघावर ७-६ गोलांनी विजय मिळवत ज्ञानदीपच्या मुलींनी विजयी घोडदौड सुरू केली.
अंतिम सामन्यात मुंबई शहरासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध ज्ञानदीपच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक व शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट संघभावना, चपळाई, बचावफळीची भक्कम कामगिरी आणि निर्णायक क्षणी केलेल्या गोलांच्या जोरावर त्यांनी १३-९ असा विजय मिळवत महाराष्ट्राचे अजिंक्यपद पटकावले. कु. आर्या समीर जाधव, कु. जान्हवी सचिन सूर्यवंशी, कु. शमिका मुकेश ढोले-पाटील, कु. श्रद्धा सचिन वाघमारे, कु. शरयू सचिन जाधव, कु. ऋत्वा संभाजी खांडे, कु. आराध्या अविनाश पिसाळ, कु. स्पृहा अमोल पवार, कु. ईशा सुनील निकम आणि कु. अंकिता सचिन कदम यांनी विजेतेपदाच्या ऐतिहासिक कामगिरीत मोलाची भूमिका बजावली.
या संघाला मार्गदर्शक शिक्षक सचिन नानासाहेब लेंभे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षणासह खेळाडूंची जिद्द, कठोर सराव आणि संघभावनेमुळे हे यश साकार झाले. या ऐतिहासिक यशाबद्दल ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शुभांगी पवार यांनी सर्व विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच सचिन लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाचे व मेहनतीचे विशेष कौतुक केले. ज्ञानदीपच्या रणरागिणींनी मिळविलेले हे राज्यस्तरीय अजिंक्यपद वाईच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











