नातेपुते पोलिसांकडून आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
नातेपुते- “ई-केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल,” अशी भीती दाखवून गरीब व निष्पाप नागरिकांकडून आधार क्रमांक, बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन आणि फेस ऑथेंटिकेशन घेत त्याचा गैरवापर करणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा नातेपुते पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या रेशन दुकानदारासह सहा जणांना अटक करण्यात आली असून, आणखी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोंढे- मोहितेवाडी, फडतरी आणि लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांना आरोपींनी ई-केवायसीच्या नावाखाली गाठले. रेशन सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांचे बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन आणि फेस ऑथेंटिकेशन घेण्यात आले.
मात्र, या संवेदनशील माहितीचा कथित गैरवापर करून नागरिकांच्या नावावर परस्पर सिमकार्ड काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अशा प्रकारे सुमारे २५० व्होडाफोन-आयडिया सिमकार्ड काढण्यात आली. ही सिमकार्ड विविध पेमेंट ॲप्सशी जोडून त्यांचा वापर बनावट बँक खाती अर्थात ‘म्युल अकाउंट’साठी करण्यात आल्याचा संशय आहे.
सायबर गुन्ह्यांसाठी नागरिकांची ओळख वापरल्याचा आरोप
नागरिकांच्या नावावर तयार करण्यात आलेली खाती व सिमकार्डचा वापर सायबर गुन्ह्यांतील आर्थिक व्यवहार, कर्ज प्रकरणे आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी करण्यात येत असल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ई-केवायसीच्या नावाखाली नागरिकांकडून घेतलेल्या बायोमेट्रिक व ओळखविषयक माहितीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या कारवाईमुळे समोर आला आहे.
या प्रकरणात नातेपुते पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी वर्धनमान उर्फ लाला वसगडेकर, रा. नातेपुते, रेशन दुकानदार प्रशांत पांडुरंग साठे, हरिराम काशिनाथ जाधव, ऋषभ बाळासाहेब मोहिते, दत्ता शिंदे, दादा निंबाळकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान एकूण १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ३ लॅपटॉप, ५ बायोमेट्रिक सिस्टीम, ७ मोबाईल फोन, १ जीपीएस मशीन, महिंद्रा एक्सयूव्ही
तसेच रोख रक्कम ३९ हजार रुपये यांचा समावेश आहे. नातेपुते पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या रॅकेटचा वापर आणखी किती नागरिकांची माहिती, सिमकार्ड किंवा बँक खाती उघडण्यासाठी करण्यात आला आहे, तसेच या माध्यमातून किती आर्थिक व्यवहार झाले आहेत, याचा पुढील तपास नातेपुते पोलीस करीत आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपपोलीस अधीक्षक विशाल नवले, नातेपुतेचे सपोनि विशाल वायकर, पीएसआय महादेव पिसाळ, शेळके, राहुल रूपनवर, अमोल वाघमोडे, मनोज शिंदे, रणजीत मदने, अमोल देशमुख, दिनेश रणनवरे, नवनाथ चव्हाण तसेच सायबर पोलीस ठाण्याचे अजित सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ई-केवायसीच्या नावाखाली नागरिकांची बायोमेट्रिक किंवा वैयक्तिक माहिती घेऊन तिचा गैरवापर होण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आधार, बायोमेट्रिक किंवा मोबाइलशी संबंधित माहिती देताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































