समृद्धी महामार्गावरील लुटमार प्रकरणातील ७ फरार आरोपींना वैजापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक १८ हडसपिंपळगावजवळ वाहन अडवून चालकाला मारहाण व लुटमार करणाऱ्या टोळीतील फरार असलेल्या दोन कुख्यात सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नाट्यमयरित्या उजनी जलाशयाजवळील दाट ऊसाच्या शेतातून जेरबंद केले. ज्ञानेश्वर शहादेव जाधव (वय ३४, रा. मालेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) आणि उमेश लक्ष्मण गायकवाड (वय २७, रा. पिठी नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे दोन्ही आरोपी सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपींचा माग काढत पोलीस पथक इंदापूर नजीक पोहोचले असता आरोपी युनिकॉर्न मोटारसायकलवरून जात असल्याचे दिसले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी विरुद्ध दिशेने गाडी वळवून उजनी धरणाच्या जलाशयाच्या दिशेने पळ काढला आणि हिजगुडे वस्ती (शहागाव, ता. इंदापूर) येथील दाट ऊसाच्या शेतात आश्रयाला गेले.
उजनीच्या पाण्याचा कडा, अचानक सुरू झालेला पाऊस आणि वन्यप्राण्यांचा धोका अशा प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांनी विशेष रणनीती आखली. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खांद्यावर अवजारे घेऊन शेतकऱ्यांचा वेश धारण केला. परिसरात केवळ शेतकरीच आहेत असा भ्रम निर्माण झाल्याने लपलेले आरोपी बाहेर पडले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पथकाने झटापटीनंतर दोघांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत परशुराम गायकवाड, करण जाधव, किरण गायकवाड, अनिल जाधव, पंडित लष्करे, उमेश गायकवाड आणि ज्ञानेश्वर जाधव अशा एकूण ७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पो.उप.नि. भरत निकाळजे, सचिन राठोड, सुनील गोरे, संतोष डोंगरे, अनिल काळे, शिवाजी मगर व वैजापूर पोलीस पथकाने केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























