सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील घटना; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
शिवशाही वृत्तसेवा,सिंदखेड राजा (विशेष प्रतिनिधी)
तालुक्यातील झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जगन्नाथ मधुकर शिंदे (वय ४०) यांनी ३१ जुलै रोजी सकाळी समृद्धी महामार्गावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक जगन्नाथ शिंदे यांचे मलकापूर पांगरा येथे स्वतःचे 'कृषी सेवा केंद्र' आहे. ३१ जुलैच्या सकाळी ते नेहमीप्रमाणे कृषी सेवा केंद्रात गेले आणि तेथून त्यांनी विषारी औषध घेतले. त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनाने समृद्धी महामार्गावरील तढेगाव फाट्याकडे रवाना झाले. तेथे त्यांनी सोबत आणलेले विषारी औषध प्राशन केले.
दरम्यान, सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुकानातील कर्मचारी मुलगा नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेला असता, त्याला शिंदे तेथे दिसून आले नाहीत. यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबियांनी तातडीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधाशोध सुरू असतानाच समृद्धी महामार्गावरील तडेगाव फाट्याजवळ त्यांची चारचाकी गाडी आणि शिंदे हे अस्वस्थ अवस्थेत आढळून आले.
कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या टोकाच्या पावलामागचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
या घटनेप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात मर्ग नोंदवण्यात आला असून, ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मुंडे पुढील तपास करत आहेत.
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























