नागठाणे येथे सापळा रचून ट्रकसह २५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त; बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बंदी असलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. चिरमुरेच्या पोत्यांच्या आड लपवून नेण्यात येत असलेला तब्बल १७ लाख ६५ हजार ९४० रुपये किमतीचा ८९५.८ किलो गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला असून, एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते.
विश्वसनीय माहितीच्या आधारे ३ ऑगस्ट रोजी पहाटे नागठाणे येथील हायवे पुलाजवळ सापळा रचून एमएच १० / झेड ४६९६ क्रमांकाचा मालट्रक अडवण्यात आला. तपासणीदरम्यान चिरमुरेच्या पोत्यांच्या आड मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला आणि तंबाखूचा अवैध साठा आढळून आला.
कारवाईची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली आप्पासाहेब खापणे घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीत अवैध साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
बंदी असलेल्या गुटख्याविरोधातील ही कारवाई सातारा पोलिसांच्या अवैध व्यवसायाविरोधातील मोहिमेतील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























