प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात विनायक सावंतांचे आमरण उपोषण सुरू
शिवशाही वृत्तसेवा, नातेपुते (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी )
नातेपुते शहरातील जनतेच्या मूलभूत हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात आज, दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ पासून पालखी मैदान, नातेपुते येथे विनायक सावंत यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. या आक्रमक आंदोलनामुळे स्थानिक प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शहरवासीयांकडून या लढ्याला पाठिंबा मिळत आहे.
सोहळ्यात वीज पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे अपयशी ठरले, तर नागरिकांना पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल सहन करावे लागले, असा रोष उपोषणकर्ते व नागरिकांनी व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी विनायक सावंत यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, महावितरणचे आणि नगरपालिकेचे सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मुख्य मागणी लावून धरली आहे.
या आंदोलनातील सर्वात जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे, पालखी सोहळा २०२६ दरम्यान झालेला तब्बल ५५ लाख रुपयांचा खर्च होय! या प्रचंड उधळपट्टीमध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असून हा अत्यंत संशयास्पद खर्च असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी ठाम मागणी या उपोषणातून करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून उपोषणाच्या अंतर्गत प्रमुख मागण्या:
अन्यायकारक कर रद्द करा: नगरसेवकांचा स्पष्ट विरोध व नकार असतानाही सामान्य नागरिकांच्या माथी मारण्यात आलेली नवीन कर आकारणी तात्काळ मागे घेण्यात यावी.
पाणीसाठा वाढवा: नातेपुते पाणीपुरवठा तलावाचे खोलीकरण व रुंदीकरणाचे प्रलंबित काम तातडीने हाती घेण्यात यावे.
विकासकामे मार्गी लावा: शहरातील नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी आणि वर्षानुवर्षे रखडलेली सर्व विकासकामे त्वरित पूर्ण करावीत.
रस्ते, गटारे व वीज पुरवठा सुधारा: राज्यमार्ग क्र. १२४ (दहीगाव रोड) येथील अपूर्ण व रखडलेले बंदिस्त गटाराचे काम तात्काळ सुरू करणे, वालचंदनगर ३३ केव्ही वीजवाहिनी पूर्ववत सुरू करणे आणि संपूर्ण शहरातील विजेचे तांत्रिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करणे.
शहराच्या हिताचा आणि हक्काचा हा लढा अखेर यशस्वी होणार का? आणि सुस्त प्रशासन यावर नेमकी काय पावले उचलणार? याकडे आता संपूर्ण माळशिरस तालुक्याचे डोळे लागून राहिले आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























