चिद्रावारांच्या तीनही कापड दुकानांवर एकाचवेळी तपासणी
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहरातील प्रसिद्ध चिद्रावार कापड दुकानाच्या तीनही शाखांवर जीएसटी विभागाच्या पथकाने मागील तीन दिवसांपासून एकाचवेळी तपासणी सुरू केल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल ३० ते ३५ अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी असल्याची माहिती आहे.
तीनही दुकानांमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार, मालाची खरेदी-विक्री किंमत, उपलब्ध साठा तसेच व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे. मालाची खरेदी पक्क्या बिलावर झाली आहे की अन्य कागदपत्रांवर, यासह जीएसटीशी संबंधित विविध बाबींची पडताळणी सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, सुमारे सहा-सात महिन्यांपूर्वी नायगावातील एका प्रसिद्ध कापड दुकानावर जीएसटी विभागाने कारवाई केली होती. त्या कारवाईनंतरही नेमका काय निष्कर्ष निघाला, याबाबत व्यापारी वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आता चिद्रावारांच्या तीनही शाखांवर सुरू असलेल्या कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे.
कारवाई केवळ औपचारिक ठरणार की ठोस निष्कर्ष समोर येणार? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मागील कारवाईप्रमाणे ही तपासणीही केवळ कागदोपत्री सोपस्कार ठरणार की प्रत्यक्षात काही गंभीर अनियमितता समोर येणार, याची उत्सुकता आहे. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र तपासणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, जीएसटीची ही कारवाई आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता असून, तपासणीनंतर विभागाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे नायगावसह परिसरातील व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























