हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विकासासाठी माजी विद्यार्थी एकवटले; शैक्षणिक व भौतिक प्रगतीला मिळणार गती
शिवशाही वृत्तसेवा,माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी भारतरत्न पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या ज्ञानयज्ञाची समृद्ध परंपरा पुढे नेणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्याशी सातत्याने जोडून घेत शाळेच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे माजी विद्यार्थी श्री. विरेंद्र शिंदे (दादा) यांची हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडीच्या स्कूल कमिटीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे नियुक्तीपत्र विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. देठे मॅडम यांच्या हस्ते श्री. शिंदे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित घाडगे, सदाशिव सस्ते, डी. जी. रणवरे, डॉ. विलास देशमुख, नितीन कदम, धनंजय रुपनवर, राहुल तनपुरे, मंजीत भगत, मदन रणवरे, ज्ञानेश्वर जगदाळे, यशवंत ढेंबरे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्ष कृतीतून योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्याच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, या उद्देशाने श्री. विरेंद्र शिंदे यांनी विद्यालयाच्या विकासासाठी सातत्याने सकारात्मक पुढाकार घेतला आहे.
विद्यालयाच्या विकासाची केवळ संकल्पना मांडण्यापुरते मर्यादित न राहता विविध विकासकामांच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यांनी सहकाऱ्यांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेतला. कामाचा दर्जा, अचूक नियोजन आणि वेळेत काम पूर्ण करण्यास प्राधान्य देत शाळेच्या भौतिक तसेच शैक्षणिक प्रगतीला त्यांनी हातभार लावला आहे.
माजी विद्यार्थ्यांची एकजूट ही शाळेच्या विकासाची मोठी ताकद आहे, या भूमिकेतून श्री.विरेंद्र शिंदे यांनी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्यात संवाद व समन्वय निर्माण करून विद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांची सकारात्मक ऊर्जा एकत्रित करण्याचे काम त्यांनी केले. माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयातून विद्यालयाच्या विकासाला व्यापक लोकसहभागाची जोड मिळाली.
श्री. विरेंद्र शिंदे यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे परखड भूमिका, पारदर्शकता, नियोजनबद्ध कामकाज आणि प्रत्येक कामातील बारकाव्यांकडे असलेले सूक्ष्म लक्ष. रयत शिक्षण संस्थेच्या मूल्यपरंपरेशी आपली कार्यपद्धती जोडून त्यांनी प्रत्यक्ष कामातून त्याचे फलित दिसावे, या भूमिकेतून सातत्याने कार्य केले आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत स्कूल कमिटीच्या निमंत्रित सदस्यपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.
स्कूल कमिटीचे निमंत्रित सदस्य म्हणून विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, माजी विद्यार्थी व समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढविणे आणि रयत शिक्षण संस्थेच्या मूल्यपरंपरेला अधिक प्रभावीपणे पुढे नेणे, या दिशेने त्यांच्या योगदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, श्री. विरेंद्र शिंदे (दादा) यांच्या निवडीबद्दल परिसरातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक, रयत शिक्षण संस्थेचे हितचिंतक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. रयतच्या संस्कारांची शिदोरी, विकासाची दृष्टी आणि प्रत्यक्ष कामाची तळमळ यांचा संगम असलेल्या श्री. विरेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वातून हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडीच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी कार्यशील शिक्षक फिरोज मुलाणी सर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























