रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचा नागरिकांना नाहक त्रास
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरातील गंगापुरी परिसरात शाळा क्रमांक ५ समोरील वाई–धोम मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे नूतन डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या परिस्थितीसाठी तातडीने दुरुस्ती न केल्याबद्दल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त होत आहे.
याच रस्त्यालगत सातारा जिल्ह्यात नावाजलेली नगरपालिकेची शाळा क्रमांक ५ असून, शाळेसमोर दररोज स्कूल बस उभ्या राहत असतात. हजारो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पालक याच मार्गाने ये-जा करतात. मात्र इतक्या गंभीर परिस्थितीकडे संबंधित विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे.
दरम्यान, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी रस्त्यावर आडवा चर खोदण्यात आला होता. मात्र तो योग्य पद्धतीने बुजविण्यात न आल्याने आता त्याचे मोठ्या खड्ड्यात रूपांतर झाले आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. "एखादा निष्पाप बळी गेल्यानंतरच पालिका प्रशासन जागे होणार का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून काही महिन्यांपूर्वी केलेल्या या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी प्रशासनावर सडकून टीका केली आहे. "अरे अजून किती खाल? तुम्हाला भस्म्या झालाय का? मढ्याच्या टाळूवरच लोणी अजून किती खाणार?" अशा तीव्र शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, शाळा क्रमांक ५ प्रभाग क्रमांक ७ मध्ये की ८ मध्ये, यावर चर्चा करण्यात धन्यता मानणारे लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का, असा सवालही उपस्थित होत आहे. "आम्ही आमच्या प्रभागात विकासकामे करू, तुम्ही तुमच्या प्रभागात करा," अशा वादांनी सभागृह दणाणून सोडणारे लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नावर मात्र मूग गिळून गप्प का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित असलेल्या या समस्येकडे संबंधित विभाग आणि पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, यात तिळमात्र शंका नाही.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























