मानद प्राणी कल्याण अधिकाऱ्यांची नियुक्तीनंतरची पहिली कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाबळेश्वर येथे चार देशी खिलार बैलांची कथित बेकायदा वाहतूक उघडकीस आणत पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोरक्षक, मानद प्राणी कल्याण अधिकारी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे चारही गोवंश सुरक्षितपणे वाचविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे मानद प्राणी कल्याण अधिकारी सिद्धार्थ लाखे व अभय शिंदे, तसेच अखिल भारत कृषी गोसेवा संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई व महाबळेश्वर तालुक्यातील गोरक्षकांनी महाबळेश्वर एसटी स्थानक परिसरात संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपमधून चार देशी खिलार बैलांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
तक्रारदार विशाल शंकर उतेकर (रा. हरोशी, ता. महाबळेश्वर) यांच्या तक्रारीवरून चालक भारत आप्पासो गडदे (वय २१, रा. चिवचोळी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जनावरांना आवश्यक सुविधा न देता व आवश्यक परवानग्यांशिवाय वाहतूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी महाराष्ट्र पशुसंवर्धन, प्राणी क्रूरता प्रतिबंधक, तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष मारुती शेलार करीत आहेत.
कारवाईनंतर चारही बैलांना सुरक्षितपणे करुणा मंदिर गोशाळेत दाखल करण्यात आले. मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सिद्धार्थ लाखे व अभय शिंदे यांनी केलेली ही पहिली यशस्वी कारवाई ठरली.
या मोहिमेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुका, अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाबळेश्वर तालुका तसेच गोरक्षक विशाल उतेकर, विक्रम उतेकर, ओंकार पवार, विशाल काळोखे, अभय जाधव, गणेश मांढरे, अविनाश रांजणे, गौरव जाधव, प्रशांत भोईटे, आशुतोष मोहिते आदींनी सहभाग घेतला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



